|
राज्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालून पर्यटकांच्या मेजवान्या कोणी होऊ दिल्या ? पोलीस आणि प्रशासन यांनी या पर्यटकांकडून कोरोनाविषयीच्या नियमावलीचे पालन का करून घेतले नाही ?
पणजी, २ जानेवारी (वार्ता.) – गोवा हे ‘बनाना रिपब्लीक’ (राजकीय अस्थिरता असलेला प्रदेश) नव्हे. पर्यटकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गोव्यात काळजी घेतली पाहिजे. सामाजिक अंतर पाळता येईल, अशाच कार्यक्रमांचे आयोजन करणे, तसेच मास्क घालणे याविषयी लोकांना अनेक वेळा सांगितले गेले; मात्र याचे पालन केले गेले नाही. सध्या परराज्यातून आलेल्या पर्यटकांचा स्थानिकांशी संपर्क आला आहे. यामुळे जानेवारी मासात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करून आधुनिक वैद्य आणि आरोग्य कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त ताण आणला जात आहे. त्यांचे जीवन धोक्यात घातले जात आहे, अशी चेतावणी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने राज्यात आलेल्या पर्यटकांनी मार्गदर्शक तत्त्वांना तिलांजली दिल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे पत्रकारांना संबोधित करत होते.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात प्रतिदिन १२ सहस्र पर्यटक येत आहेत. पर्यटकांनी लक्षात घेतले पाहिजे की, ते मजा लुटू शकतात; मात्र सुरक्षेकडेही लक्ष दिले पाहिजे. ‘गोमंतकीय कसे सुरक्षित रहातील’, हे पाहिले पाहिजे. राज्यातील आर्थिक व्यवहार चालला पाहिजे; मात्र यासाठी पूर्ण दक्षता घेतली पाहिजे. मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन न झाल्यास ‘नाईट क्लब’वर कारवाई करण्यात येणार आहे.’’
मास्क न घालणार्यांना ५०० रुपये दंडाची शिफारस
विमानतळावरील ६० टक्के लोकांनी मास्क घातले नव्हते, हे मी स्वत: पाहिले आहे. काही लोकांना मास्क घालणे ही ‘फॅशन’ वाटत आहे. त्यामुळे ते मास्क हनुवटीवर घालतात. मास्क न घालणार्यांना ५०० रुपये दंड करण्याची शिफारस आरोग्य खाते शासनाकडे करणार आहे.