कसाल (सिंधुदुर्ग) येथील श्री पावणाईदेवी आणि श्री रवळनाथदेवाचा वार्षिक जत्रोत्सव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कसाल येथील श्री पावणाईदेवी आणि श्री देव रवळनाथ मंदिर हे जागृत देवस्थान आहे. या देवता नवसाला पावतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या देवतांचा वार्षिक पालखी उत्सव आणि जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्थी (३ जानेवारी २०२१) या दिवशी साजरा होत आहे.

संकलक : श्री. यशवंत परब, कसाल, सिंधुदुर्ग.

जत्रोत्सवाच्या दिवशी श्रींची नित्यपूजा, अभिषेक, लघुरुद्र इत्यादी धार्मिक विधी केले जातात. सायंकाळी मंदिराच्या सभोवती देवतांची पालखी मिरवणूक काढली जाते. हा पालखी सोहळा पहाण्यासाठी आणि देवतेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी असते. रात्री दशावतारी नाट्यप्रयोग असतो. या मंदिराचे पुजारी श्री. बाबू गुरव हे नित्यनेमाने देवतेची पूजा करतात. येथे प्रसादासाठी देवतेला कौल लावले जातात. मंदिरात श्री पावणाईदेवी, श्री देव रवळनाथ, श्री काळकाईदेवी, श्री नवलाईदेवी आणि श्री देव गांगो असे ५ तरंग आहेत. प्रतीवर्षी कसाल गावची राठी पालखी, तरंग यांसह सर्व गावकरी आणि ग्रामस्थ मंडळींसह देवीच्या मूळ स्थानी म्हणजे गांगोची राई येथे अन् ओसरगाव येथील नदीकिनारी वसलेली देवी श्रीनही देवी यांच्या भेटीसाठी जाते. तेथे दोन्ही वेळी महाप्रसाद दिला जातो.

या मंदिरात नवरात्री, दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा, हरिनाम सप्ताह, रामनवमी आदी उत्सव नियमित साजरे केले जातात. प्रत्येक सोमवार आणि गुरुवार यांदिवशी रात्री ८ वाजता मंदिरात सामूहिक आरती केली जाते.

जत्रोत्सवाच्या कालावधीत कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचे आवाहन

‘यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर जत्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे जत्रोत्सवाच्या दिवशी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाविषयीचे नियम पाळून जत्रोत्सवात सहभागी व्हावे अन् दर्शन घ्यावे’, असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामदेवता

गावाची मुख्य देवता म्हणजे ग्रामदेवता. गावाचे संरक्षण करणे हे यांचे मुख्य कार्य होय. निरनिराळ्या साथीच्या रोगांपासून गावकर्‍यांचा बचाव आणि मुक्तता, तसेच गुराढोरांचे रोग यांपासून ग्रामदेवता रक्षण करते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘परमेश्‍वर, ईश्‍वर, अवतार आणि देव’)

कुलदेवतेची उपासना !

आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, हे जाणून घेतल्यास अध्यात्मात प्रगती होते.