साप्ताहिक शास्त्रार्थ
‘१५.१२.२०२० या दिवसापासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, उत्तरायण, हेमंतऋतू, मार्गशीर्ष मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयानंतर वार पालटतो.
टीप २ – प्रदोष, घबाड मुहूर्त, भद्रा (विष्टी करण), यमघंट योग आणि संकष्ट चतुर्थी यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे. टीप ३ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. १. हरिचिया दासा हरि दाही दिशा । अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. २. तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ॥ – संत तुकाराम अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’ ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’ |
२. शास्त्रार्थ
२ अ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. ३.१.२०२१ या दिवशी सकाळी ८.२३ पर्यंत आणि ७.१.२०२१ या दिवशी रात्री ११.५८ पासून ८.१.२०२१ या दिवशी दुपारी २.१२ पर्यंत आणि ९.१.२०२१ या दिवशी दुपारी १२.३२ पासून सायंकाळी ७.१७ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ आ. यमघंट योग : वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने ‘यमघंट योग’ होतो. ३.१.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.५७ पर्यंत मघा नक्षत्र आणि रविवार एकत्र आल्याने ‘यमघंट योग’ होतो. हा अनिष्ट योग आहे. या योगावर कधीही प्रवास करू नये.
२ इ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. ५.१.२०२१ या दिवशी पहाटे ५.४७ पासून सायंकाळी ४.५८ पर्यंत आणि ८.१.२०२१ या दिवशी सकाळी १०.५० पासून रात्री ९.४१ पर्यंत विष्टी करण आहे.
२ ई. सफला एकादशी : मार्गशीर्ष कृष्ण एकादशीला ‘सफला एकादशी’ म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूच्या नारायण रूपाची पूजा करतात. या एकादशीला दीपदान करतात. रात्री जागून श्री विष्णूचे नामस्मरण, कीर्तन करावे. या एकादशीच्या व्रतामुळे श्रीहरिची कृपा होते, राजसूय यज्ञाचे फळ प्राप्त होते आणि पुण्य मिळते.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२५.१२.२०२०)