Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !

महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाचा अभाव . . . माहिती अधिकारातून उघड !

मुंबई – महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाचा अभाव असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. ३० जून २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, पोलीस दलातील २ लाख २५ सहस्र ४६१ संमत पदांपैकी २३ सहस्र ३२० पदे रिक्त आहेत. सर्वाधिक रिक्त पदे पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील आहेत. ‘असोसिएशन ऑफ सोशल अँड आरटीआय ॲक्टिव्हिस्ट्स’ संस्थेचे अध्यक्ष संजय थुल यांनी माहिती अधिकारातून याविषयीची माहिती मागवली होती. महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयातील जनमाहिती अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक सतीश जाधव यांनी ही माहिती उपलब्ध करून दिली.

पोलीस अधीक्षक ते पोलीस महासंचालक संवर्गातील (श्रेणीतील) ४५४ संमत पदांपैकी ४२४ पदे भरलेली असून ३० पदे रिक्त आहेत, तसेच पोलीस उपअधीक्षक संवर्गातील ९७२ संमत पदांपैकी ७८७ पदे कार्यरत असून १८५ पदे रिक्त आहेत.

संजय थुल यांनी ‘राज्यातील वाढती लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार लक्षात घेता २३ सहस्रांहून अधिक रिक्त पदे तातडीने भरावीत’, अशी मागणी केली आहे. ‘संयुक्त राष्ट्रांच्या निकषांनुसार प्रति १ लाख लोकसंख्येमागे २२२ पोलिसांचे प्रमाण गाठण्यासाठी संमत केलेली पदसंख्या वाढवावी’, यासाठी शासनाला निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (असे निवेदन का द्यावे लागते ? सरकार यादृष्टीने अभ्यास आणि पदे भरतीसाठी प्रयत्न का करत नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका

महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी पहाता इतक्या संख्येने पदे रिक्त रहाणे, हे पोलीस प्रशासनाचे अपयशच आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम पोलीस दल असणे अत्यावश्यक आहे ! सरकार ही रिक्त पदे कधीपर्यंत भरणार ?, हे जनतेला कळायला हवे !