Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !

कॉकरोच जनता पक्षाने चर्चेसाठी ठेवली अट

नवी देहली – २२ जुलैला सकाळीही देहली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आम्हाला सांगितले की, सरकार चर्चा करू इच्छिते; परंतु आम्ही कोणत्याही नेत्याच्या कार्यालयात किंवा घरी बैठक करणार नाही. एकतर नेत्यांनी जंतरमंतरवर यावे किंवा मग ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’सारख्या एखाद्या सार्वजनिक ठिकाणी बैठक होऊ शकते, अशी भूमिका कॉकरोच जनता पक्षाने (‘सीजेपी’ने) घेतल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी दिली. ते म्हणाले की, सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास आम्ही सिद्ध आहेत. सरकारने आधी खोटे सांगितले होते की, सीजेपी चर्चा करू इच्छिते; मात्र आता सरकारने स्वतःच मान्य केले आहे की, सरकार चर्चेसाठी सिद्ध आहे.

सरकारने पहिल्याच दिवशी बोलायला हवे होते !

सौरव दास म्हणाले की, सरकारने आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी चर्चा करायला हवी होती. कालही सरकारच्या बाजूने चर्चेचा प्रस्ताव आला होता. आम्ही सर्व सुशिक्षित लोक आहोत, आम्हालाही ठाऊक आहे की, चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा निघेल.

यापूर्वी केंद्र सरकार आणि कॉकरोच जनता पक्ष यांच्यात २० जुलैला सायंकाळी पहिल्यांदाच चर्चा झाली होती. त्या वेळी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी त्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला आणि सरकारचे नेतृत्व त्यांच्या मागण्यांवर अंतर्गत चर्चा करेल, असे आश्वासन दिले होते.