कन्हाळगाव (जिल्हा चंद्रपूर) येथे अभयारण्य उभारण्यास ४७ गावांतील गावकर्‍यांचा विरोध  

( प्रतिकात्मक चित्र )

चंद्रपूर – शासनाने नुकतेच जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्य घोषित केले आहे. वन्यजीवप्रेमी संघटनांनी या नव्या अभयारण्याचे स्वागत केले आहे; मात्र गोंडपिंपरी, बल्लारपूर आणि पोंभुर्णा तालुक्यांतील ४७ गावांनी या अभयारण्याला विरोध केला आहे. या भागात वर्षांनुवर्षे वनरोजीवर अवलंबून असणार्‍यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे, असा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. अभयारण्य करण्याचा निर्णय रहित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी गावकर्‍यांनी शासनाला दिली आहे.

कन्हाळगाव अभयारण्याचे एकूण क्षेत्र २६९ चौरस किलोमीटर असून हे वनक्षेत्र वाघांचा महत्त्वाचा भ्रमणमार्ग आहे. अभयारण्य घोषित झाल्याने जिल्ह्यातील व्याघ्र संवर्धन समृद्ध होईल, असे मानले जात आहे. कन्हाळगाव अभयारण्याच्या कोअर आणि बफर झोनमुळे या क्षेत्रातील ४७ गावे बाधित होणार असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली आहे. अभयारण्यातील बहुतांशी अरण्य सध्या वनविकास महामंडळाच्या कह्यात आहे. महामंडळाच्या वतीने सहस्रो स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगार मिळतो. याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे.