मार्गशीर्ष शुक्ल पक्ष त्रयोदशी (२७.१२.२०२०) या दिवशी कु. सान्वी अमेय लोटलीकर हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. सान्वी अमेय लोटलीकर हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. श्री. अमेय आणि सौ. आर्या लोटलीकर (सान्वीचे वडील आणि आई), डोंबिवली पूर्व
१ अ. आनंदी : ‘सान्वीचा स्वभाव आनंदी आणि खेळकर आहे. आपण रागावलो असलो, तर ती काहीतरी बोलते, नाचून दाखवते किंवा काहीतरी करते, ज्यामुळे आपला राग कुठल्या कुठे पळून जातो. ती नेहमी आनंदी रहाते आणि इतरांनाही आनंदी रहाण्यासाठी साहाय्य करते.
१ आ. उत्तम स्मरणशक्ती : सान्वी आणि पूर्ती (सान्वीची मोठी बहीण) प्रतिदिन संध्याकाळी गणपति स्तोत्र, रामरक्षा आणि मारुति स्तोत्र म्हणतात. सान्वी दीड वर्षाची होती, तेव्हाच तिचे मारुति स्तोत्र पाठ झाले होते. तेव्हापासून ती नेहमी मारुति स्तोत्र म्हणते. आम्ही कुठेही बाहेर किंवा प्रवासात असलो, तर तिथेही त्या दोघी बहिणी न चुकता सर्व स्तोत्रे म्हणतात.
१ इ. स्वावलंबी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या दळणवळण बंदीमुळे सर्व मुलांचा अभ्यास घरातूनच चालू आहे. सान्वीच्या शाळेतून अभ्यासाच्या चित्रफिती (‘व्हिडिओज्’) येतात. त्या बघून तिचा अभ्यास करवून घ्यायचा असतो. काही कारणास्तव मला वेळ मिळाला नाही, तर ती स्वतःच अभ्यासाच्या चित्रफिती बघते आणि त्यानुसार अभ्यास करण्याचा प्रयत्न करते. तिला चित्रकला हा विषय फार आवडतो. त्या विषयीच्या सर्व चित्रफिती ती न चुकता बघते आणि त्यानुसार सर्व कृती करते. हस्तकलेच्याही ज्या काही चित्रफिती येतात, त्यांचा ती स्वतःहून अभ्यास करते आणि त्याप्रमाणे ती सर्व वस्तू सिद्ध करते.
१ ई. मधुर बोलणे : सान्वीचे बोलणे कानांना फार गोड वाटते. ‘तिचे बोलणे ऐकतच राहावे’, असे वाटते. आमच्या घरी कुणी पाहुणे आले किंवा आम्ही कुठे गेलो, तर ‘तुमची सान्वी किती गोड बोलते हो ?’, असा अभिप्राय मला निश्चितपणे ऐकायला मिळतो.
१ उ. चांगली आकलनक्षमता : बर्याच वेळा लहान मुलांना दूरचित्रवाणीवरील वार्ता बघायला आवडत नाही; पण सान्वीचे बाबा वार्ता बघतात, त्या वेळी सान्वी आणि पूर्ती दोघीही वार्ता बघतात. त्या ‘त्यातून त्यांना काय समजले ?’, हे आम्हाला सांगतात. त्यामध्ये राजकीय विश्लेषण किंवा सध्याची स्थिती यांविषयी काही वार्ता असतील, तरी त्या सान्वीला बर्याच प्रमाणात कळतात. ‘मोदीआजोबा पंतप्रधान आहेत, पाकिस्तान भांडखोर आणि वाईट आहे. चीनचे सामान आपण घ्यायचे नाही’, या आणि अशा बर्याच गोष्टी तिला ठाऊक आहेत.
१ ऊ. प्रेमळ
१ ऊ १. भावंडांविषयी असलेले प्रेम
अ. काही कारणास्तव पूर्ती रडत असेल, तर सान्वी तिची विचारपूस करते आणि मला सांगायला येते, ‘‘आई, ताई रडत आहे. ‘तिला काय झाले ?’, ते बघ.’’ तिला पूर्ती रडलेली मुळीच आवडत नाही. ती अनेक प्रकारे पूर्तीला समजवण्याचा प्रयत्न करते. मी पूर्तीला ओरडत असेन, तेव्हा ती मला समजावते, ‘‘अग आई, ताईने मुद्दाम असे केले नसेल.’’ त्या वेळी कधी मी तिला म्हणते, ‘‘तू ताईची वकील आहेस. ताईने काहीही केले, तरी तुझ्याकडे त्याचे स्पष्टीकरण असते.’’
ऊ २. इतर लहान मुलांविषयी प्रेम वाटणे : सान्वीमध्ये ममत्व आहे. तिला लहान मुलांविषयी पुष्कळ प्रेम वाटते. ती त्यांच्याशी प्रेमाने खेळते आणि त्यांना प्रेमाने हात लावते. ती त्यांची काळजी घेते. आपल्या वस्तू त्यांना खेळायला देते, तसेच ‘खेळतांना त्यांना लागणार नाही’, असे बघते.
१ ऊ ३. वयोवृद्धांविषयी असलेली आस्था आणि त्यांना करत असलेले साहाय्य !
१ ऊ ३ अ. आजी-आजोबांना साहाय्य करणे : सान्वी आपल्या आजी-आजोबांची वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेते. ती त्यांना अंथरूण घालायला साहाय्य करते. त्यांच्या काही वस्तू सापडत नसतील, तर ती त्या शोधून देते. आजोबा जेवायला बसल्यावर ती त्यांना पाणी आणून देते.
१ ऊ ३ आ. ‘देवबाप्पाला पणजीआजीला लवकर बरे करायला सांगूया’, असे म्हणणे : ‘तिची पणजीआजी झोपून आहे’, याचे तिला फार वाईट वाटते. ती मला विचारते, ‘‘आई, पणजीआजीला असे एका जागी झोपून कंटाळा येत असेल ना गं ? तिला फार त्रास होतो का ? आपण देवबाप्पाला तिला लवकर बरे करायला सांगूया.’’
१ ऊ ३ इ. पणजोबांना साहाय्य करण्यासाठी तत्पर असणे : एकदा आमच्या घरी तिच्या आजोबांचे काका, म्हणजे तिचे पणजोबा आले होते. त्यांच्या हातामध्ये काठी होती. ते उभे राहिले की, सान्वी लगेच त्यांना काठी द्यायची. तेव्हा ते तिला म्हणाले, ‘‘आता मला या काठीची आवश्यकता नाही. आता तूच माझी काठी !’’ तेव्हा तिला फारच हसायला आले. ते घरी असेपर्यंत ते उठून उभे रहायचे, तेव्हा सान्वी त्यांच्याजवळ धावून जायची आणि त्यांना सांगायची, ‘‘तुमची काठी आली !’’
‘या सर्व प्रसंगांतून सान्वीला वयोवृद्धांविषयी पुष्कळ आस्था असून ती त्यांचा आदर करते. कुणीही काहीही न सांगता, न शिकवता ती ‘त्यांना काय हवे-नको’, ते तिच्या परीने बघते’, असे लक्षात येते.’
१ ऐ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेला भाव
१. पूर्तीप्रमाणेच सान्वीही परम पूज्यांना ‘आबा’ म्हणते. सान्वी म्हणते, ‘‘आई, आपण माझ्या वाढदिवसाला आबांकडे जाऊया ना !’’
२. सान्वीला परम पूज्यांची फार आठवण येते. प्रतिदिन एक तरी प्रसंग असा घडतोच कि त्यातून तिला आबांची आठवण होते.
सान्वीचे बाबा प्रतिदिन ‘कृष्ण’ या मालिकेचा एक भाग तरी लावतात. आम्ही सर्व एकत्र बसून तो बघतो. त्या वेळी सान्वीला पुष्कळ प्रश्न पडतात. एकदा ‘कृष्ण’ मालिका बघून झाल्यानंतर सान्वी मला विचारत होती, ‘‘आई, आबांना कृष्ण दिसतो का गं ? आबांच्या आश्रमात गेल्यावर ते माझी कृष्णाशी भेट घडवून देतील का गं ? आई, तू त्यांना सांग ना !’’
१ ओ. कृतज्ञता आणि प्रार्थना : ‘भगवंता, ‘तूच सान्वीविषयीची सूत्रे माझ्या लक्षात आणून दिलीस आणि माझ्याकडून लिहून घेतलीस’, यासाठी मी तुझ्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.
२. सौ. संगीता लोटलीकर (आजी, वडिलांची आई)
२ अ. इतरांचा विचार करणे : ‘सान्वी लहान असली, तरी समंजस आहे. तिला कधीतरी ‘कार्टून’ पहायचे असते. त्या वेळी आमची नामजप किंवा मंत्रपठण करायची वेळ असेल, तर ती जवळ येऊन हळूच कानात विचारते, ‘‘मी हळू आवाजात दूरचित्रवाणी लावू का ?’’ आम्ही नामजपाला बसलो असतांना कधी तिची ताई दूरचित्रवाणी लावत असेल, तर ती ताईजवळ जाऊन ‘आजी नामजप करत आहे’, असे तिला हळू आवाजात सांगते.
२ आ. भाव : सान्वीला क्षात्रगीते फार आवडतात. भ्रमणभाषवर प.पू. भक्तराज महाराज यांची भजने किंवा क्षात्रगीते लावली की, ती आनंदाने सांगते, ‘‘हे सनातन संस्थेचे आहे.’’ तेव्हा ती ‘ते प.पू. गुरुदेवांचे आहे’, या भावाने सांगते.’
३. श्री. विजय लोटलीकर (आजोबा, वडिलांचे वडील)
३ अ. ऐकण्याची वृत्ती : ‘सान्वीने लिहिलेले चुकले असेल आणि तिला ‘सान्वी, हे लिखाण योग्य नाही’, असे तिला सांगितले, तर ती लगेच त्यात सुधारणा करते.
३ आ. वेळेचे गांभीर्य : सान्वीला चित्रकलेची फार आवड आहे. तिच्या हातात सतत वही-पेन असते. ते घेऊन ती कधी अभ्यास करते, तर कधी चित्र काढते. असे तिचे अखंडपणे चालूच असते. ती वेळ वाया घालवत नाही.
३ ई. प्रेमळ
१. सान्वी मोठ्या माणसांचा आदर करते. ती कुटुंबियांना अतिशय प्रेमाने आणि आदराने हाक मारते.
२. कु. सान्वी दिवसातून एकदा तरी पणजीआजीच्या खोलीत जाऊन तिला पाहून येते.’
स्वभावदोष : ‘हट्टीपणा आणि भावनाप्रधानता’ – श्री. अमेय आणि सौ. आर्या लोटलीकर (वडील आणि आई) (२५.११.२०२०)
संतांचे आज्ञापालन करण्यासाठी स्थलांतर करण्याचा पालट सहजतेने स्वीकारणे‘आपत्काळाच्या सिद्धतेसाठी आम्ही गोवा येथे स्थलांतरित होणार आहोत. सान्वी आणि पूर्ती या दोघींनीही हा फार मोठा पालट अगदीच सहजपणे स्वीकारला. ‘आपली शाळा पालटली जाणार आहे. आपल्याला आपले मित्र-मैत्रिणी भेटणार नाहीत. आपली शिक्षणपद्धत पालटणार आहे. आपल्याला नवीन घरी सर्व सुखसोयी लगेच उपलब्ध होणार नाहीत. त्यासाठी काही कालावधी जाऊ द्यावा लागेल’, या सर्व गोष्टींविषयी आम्ही उभयतांनी दोन्ही मुलींना समजावून सांगितले. त्या वेळी या सर्व गोष्टींचे त्यांना काहीही वाटले नाही. ‘संतांनी असे करायला सांगितले आहे; म्हणून आपण ते करायलाच हवे’, अशी सान्वीची धारणा आहे. पूर्ती आम्हाला म्हणाली, ‘‘आम्ही आपल्याला स्थलांतरित होण्यासाठी लागणारी कुठलीही तडजोड करायला सिद्ध आहोत. यामुळे आपला त्याग होणार आहे आणि आम्हाला देवाचा आशीर्वादही मिळणार आहे.’’ हे ऐकल्यावर सान्वीही म्हणाली, ‘‘हो आई, संत सांगतात, तसेच आपण करूया. ताई सांगेल, तसे मी वागेन. मी तिच्याशी भांडणार नाही. खेळण्यासाठी किंवा पलंगावर झोपण्यासाठी हट्ट करणार नाही. मग आता ‘आपण गोव्याला जायचे’, हे ठरले.’’ हे ऐकल्यावर आम्हा उभयतांचे डोळे भरून आले. ‘ईश्वरच आमची सिद्धता करून घेत आहे’, असे वाटले. |