पणजी, २४ डिसेंबर (वार्ता.) – गोव्यात ‘जनता कर्फ्यू’ लादण्याचा शासनाचा विचार नाही, तसेच या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडूनही काही विशेष सूचना आलेल्या नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात ‘जनता कर्फ्यू’ विषयी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनांची आम्ही वाट पहात आहोत.’’
गोव्यात येणार्यांनी अलगीकरणात रहावे आणि लक्षणे दिसत असल्यास चाचणी करावी
इंग्लंड येथून आलेल्या आणि ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीत कोरोनाबाधित झाल्याचे निष्पन्न झालेल्या पर्यटकांचे नमुने नवीन विषाणूसंबंधी चाचणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. इंग्लंड येथून मागील एक आठवड्यात आलेल्या सर्व प्रवाशांवर आरोग्य खाते देखरेख ठेवून आहे. या पर्यटकांना घरी अलगीकरणात रहाण्यास सांगण्यात आले आहे. या पर्यटकांना कोरोनाचे लहानसे लक्षणही दिसल्यास संस्थात्मक अलगीकरणात (इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन) ठेवले जात आहे. गोव्यात येणार्यांनी अलगीकरणात रहावे आणि लक्षणे दिसत असल्यास चाचणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढे केले.
इंग्लंड येथून आलेले ११ पर्यटक कोरोनाबाधित ! – विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री
पणजी – इंग्लंड येथे कोरोनाचे नवीन स्वरूपाचे रुग्ण सापडण्यास प्रारंभ झाल्यानंतर म्हणजेच ९ डिसेंबरनंतर गोव्यात इंग्लंड येथून आलेल्या ९७९ पर्यटकांची ‘आर्. टी.पी.सी.आर्.’ चाचणी करण्यात येत आहे. यात इंग्लंड येथून आलेले ११ पर्यटक सध्या कोरोनाबाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे सध्या स्वत:च्या आरोग्य चाचणीसाठी मुंबई येथे गेलेले आहेत. मुंबई येथून गोव्यातील प्रसारमाध्यमांशी बोलतांना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ही माहिती दिली. आरोग्य खात्याच्या सूत्रानुसार आरोग्य खात्याने शासनाकडे १ लाख ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ किट्सची मागणी केली आहे.