मुंबई – स्थानिक पातळीवर कोरोना विषाणूमध्ये जनुकीय पालट होतात का ? याचा ‘टास्क फोर्स’मधील डॉक्टरांनी अभ्यास करावा. नवीन प्रकारच्या कोरोनामुळे उपचाराची पद्धत याविषयी ‘टास्क फोर्स’ने अभ्यास करावा. नवीन प्रकारचा विषाणू ज्या वेगाने पसरतो, त्या प्रमाणात उपचार आणि चाचण्या यांची क्षमता ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. २२ डिसेंबर या दिवशी त्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी कोरोनाची स्थिती, कोरोना विषाणूचा दुसरा प्रकार आणि त्या अनुषंगाने घ्यायची काळजी याचा आढावा घेतला.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘कोरोनाला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्व यंत्रणांनी कष्ट घेतले. आता दुसर्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर बेसावध राहून चालणार नाही. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा साठा करून ठेवावा. अलगीकरण-विलगीकरण या सुविधा सिद्ध ठेवाव्यात. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाच्या अंतर्गत अन्य व्याधी असलेल्या नागरिकांची माहिती आरोग्य विभागाकडे आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेने अशा रुग्णांशी संपर्क करावा. त्यांची काळजी घेतांना त्यांना सतर्क करावे. कोरोनामुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण न्यून करण्यावर भर देतांना अन्य रुग्णांकडेही लक्ष द्यावे. मास्क वापरणे बंधनकारक करावे, मास्क न वापरणार्यांंवर दंडात्मक कारवाई करावी. मास्क लावा, हात धुवा आणि शारीरिक अंतर ठेवा, या त्रिसूत्रीचा अंगीकार करा. याविषयी नागरिकांमध्ये जागृती करून त्यांना धोक्याची जाणीव करून द्या.’’