अध्यात्मप्रसाराचा एक भाग म्हणून सद्गुरु सिरियाक वाले विविध देशांतील जिज्ञासू, तसेच साधक यांना भेटण्यासाठी ‘कॅराव्हॅन’मधून (निवासाच्या सोयींनी युक्त वाहन) प्रवास करत आहेत. जून २०२० मध्ये जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया येथील जिज्ञासू अन् साधक यांची त्यांनी भेट घेतली. त्या वेळी जिज्ञासूंविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि साधकाला आलेल्या अनुभूती पुढे दिली आहेत.
१. जर्मनी
१ अ. ११ आणि १२ जून २०२० : ‘या दिवशी कार्ल्सरूहे येथे सद्गुरु सिरियाक वाले यांनी केर्स्टिन माटेन, श्री. सेबॅस्टियन काम्स् आणि राफेल खाक या एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांची, तसेच रेनाटा स्टाइन अन् अँड्रिया स्टाइन या जिज्ञासूंची भेट घेतली.
१ अ १. केर्स्टिन माटेन : यांना सद्गुरु सिरियाक वाले आणि अन्य साधक यांना भेटून पुष्कळ आनंद झाला. केर्स्टिन यांच्यात सद्गुरु सिरियाक वाले यांच्याप्रती पुष्कळ भाव असून त्यांना भेटण्याची संधी मिळल्याविषयी त्या स्वतःला भाग्यवान समजतात. नोव्हेंबर २०१९ पासून त्या ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळावरील लेख वाचत आहेत, तसेच मार्च २०२० पासून त्या सत्संगांना उपस्थित रहात आहेत. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यापासून गेल्या तीन मासांत त्यांना स्वतःमध्ये सकारात्मक पालट जाणवत आहेत. गेल्या ३० वर्षांपासून त्यांना ‘निकोटिन’ आणि ‘कॅनबीज्’ यांचे व्यसन होते. ते ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर केवळ दोन मासांत न्यून झाले.
१ आ. १३ आणि १४ जून २०२० : या दिवशी फ्रीबर्ग येथे सद्गुरु सिरियाक वाले यांनी कार्ला बोम आणि लुसेरो नायथमेर या साधकांची भेट घेतली. लुसेरो यांनी सद्गुरु सिरियाक वाले यांच्याशी बोलतांना शिकायला मिळालेली सूत्रे लिहून घेतली.
१ इ. १८ ते २० जून २०२० : या कालावधीत म्युनिक येथे सद्गुरु सिरियाक वाले यांनी योट्टा पाइपर, क्रिस्टन वॉल्टमन, मारिया चोर्लुका, विल्मा स्टाफा आणि सौ. उमा बुदराजू यांची भेट घेतली.
१ इ १. योट्टा पाइपर : यांना सद्गुरु सिरियाक वाले आणि अन्य साधक यांना भेटून आनंद झाला. त्यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असतांना त्यांना आलेली अनुभूती सांगितली. त्या म्हणाल्या, ‘‘आश्रम म्हणजे माझे घरच असून ‘इथेच रहावे’, असे मला वाटत होते.’’ येथेही त्या प्रतिदिन साधकांना भेटण्यास येत होत्या. त्यांनी सांगितले, ‘‘गेल्या अनेक वर्षांत मी प्रथमच रात्री झोपू शकले. ‘कॅराव्हॅन’मध्ये साधकांची भेट झाल्यामुळेच असे झाले आहे’, असे मला वाटते.’
१ इ २. विल्मा : या ५ घंटे प्रवास करून आल्या होत्या. ‘अध्यात्माविषयी त्यांना आतूनच चांगली समज/ज्ञान असून त्यांना साधनेविषयी अधिकाधिक जाणून घ्यायचे आहे’, असे लक्षात आले.
१ इ ३. सौ. उमा बुदराजू : या वयाच्या पंधराव्या वर्षापासून साधना करत आहे. एस्.एस्.आर्.एफ्.चे संत आणि साधक यांची भेट झाल्याविषयी त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी त्यांचे मित्र-मैत्रिणी आणि शेजारी यांनाही घरी बोलावल्यामुळे तेथेच एक सत्संग आयोजित झाला.
२. स्वित्झर्लंड (१५ ते १७ जून २०२०)
२ अ. मिरियाना क्रूमेझ : सद्गुरु सिरियाकदादांना भेटून मिरियाना यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी स्वतःला आलेल्या अनुभूती कथन केल्या, तसेच स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे चिंतन सांगितले. अंतर्मुखता वाढून साधनेत पुढच्या टप्प्याला जाण्यासाठी सद्गुरु सिरियाकदादांनी केलेले मार्गदर्शन त्यांनी समजून घेतले. मधे मधे त्यांचा भाव जागृत होत होता.
२ आ. मिशेल क्रूमेझ : हे एक घंटा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि १ घंटा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करतात. यांनी स्वतःचे कार्यालय उपलब्ध करून दिले, जेणेकरून या प्रवासात एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना भेटता येईल. मिरियाना आणि मिशेल यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देण्याची इच्छा आहे.
२ इ. बिक्वॅन झँग : हा १७ वर्षांचा असून वयाच्या १२ व्या वर्षापासून तो एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावरील लेख वाचत आहे. साधकांच्या समवेत राहिल्याने त्याला साधकांशी जवळीक वाटली, तसेच साधकांच्या समवतचे आध्यात्मिक वातावरण त्याला आवडले. त्यामुळे त्याला एस्.एस्.आर्.एफ्.च्या आध्यात्मिक कुटुंबाचा एक सदस्य व्हायचे असून नेहमी साधकांच्या समवेत रहाण्याची इच्छा आहे. एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना भेटण्यासाठी तो तिसर्या दिवशी २ घंटे चालत आला.
२ ई. फिलिप एग्ली : यांनी वयस्कर असूनही ‘लाईव्हस्ट्रीम’च्या सेवेत साहाय्य केले. साधना करतांना विविध साधकांना येत असलेल्या अनुभूती ऐकण्यात त्यांना रस होता, तसेच साधकांना शक्य त्या प्रकारे साहाय्य करण्याची त्यांनी उत्सुकता दर्शवली.
२ उ. तेरेसा गुट्सो : यांनी त्यांना त्यांच्या कार्यालयात आलेली अनुभूती सांगितली. ‘कोरोना’ विषाणूंमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत तेरेसा यांच्या सहकार्यांना नोकरी जाण्याची काळजी वाटत होती; परंतु एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार ‘लॉकडाऊन’च्या काळात साधना करण्याची संधी असल्याविषयी तेरेसा यांना कळले होते. त्यानुसार त्यांनी सकारात्मक राहून प्रयत्न केल्याने त्या स्थिर आणि शांत होत्या. साधकांप्रती त्यांना जवळीक वाटत होती.’
संकलक : (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (ऑगस्ट २०२०)
अध्यात्मप्रसारासाठी केलेल्या संपूर्ण प्रवासात सद्गुरु सिरियाक वाले यांच्या समवेत असलेले एस्.एस्.आर्.एफ्.चे जर्मनी येथील साधक श्री. कार्ल बारवित्स्की यांना आलेल्या अनुभूती
‘अध्यात्मप्रसारासाठी सद्गुरु सिरियाक वाले आणि श्री. गियोम ऑलिव्हिए यांच्या समवेत ‘कॅराव्हॅन’मधून प्रवास करतांना मला आरंभी ‘इतक्या लहान जागेत मला रहाता येईल का ?’, असे वाटत होते; मात्र जसा प्रवास चालू झाला, तसा ‘मला येथील प्रत्येक क्षणाचा शिकण्यासाठी वापर करायचा असून ‘इतरांची सेवा कशी करू शकतो ?’, यावर लक्ष केंद्रित करायचे आहे’, असे मला तीव्रतेने वाटू लागले. संत आणि साधक यांच्या समवेतचा ‘कॅराव्हॅन’मधील प्रवास हीच माझ्यासाठी एक मोठी अनुभूती आणि परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी या व्यतिरिक्तही अनेक अनुभूती दिल्या आहेत. त्या पुढे दिल्या आहेत.
१. ‘कॅराव्हॅन’ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवणे
‘आम्ही ‘कॅराव्हॅन’मध्ये बसून नामजप करत असतांना मला तेथे परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवत होते. त्यांच्या मुखावर स्मित होते आणि ते साधकांकडे पहात होते. नंतर त्यांनी प्रेमाने प्रत्येक साधकाच्या खांद्यावरून हात फिरवला. गाडीतील प्रत्येक वस्तूला त्यांनी हळूवारपणे स्पर्श केला. त्यानंतर ते गाडीच्या बाहेर गेले आणि त्यांनी गाडीभोवती फिरून प्रत्येक वस्तूला प्रेमाने स्पशर्र् केला. त्या वेळी माझ्या अंतरंगातून त्यांचा आवाज ऐकू आला. ते म्हणाले, ‘कॅराव्हॅन’ म्हणजे एक आश्रमच आहे आणि या आश्रमात संपूर्ण जगभरातील साधक एकत्र येतील. या आश्रमात साधकांची एका आध्यात्मिक कुटुंबाप्रमाणे रहाण्याची सिद्धता होईल आणि ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ (कलियुगांतर्गत सत्ययुग) हे ध्येय लवकर साध्य होईल.’
२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आधीपासूनच अंतरंगात विराजमान आहेत’, असे जाणवणे, त्या वेळी स्वतःतील अहंकार आणि स्वभावदोष गळून गेल्याप्रमाणे जाणवणे अन् आतून केवळ शांत वाटणे
नामजपादी उपाय करतांना मला माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवले. त्या वेळी माझी भावजागृती होत होती. ‘मला परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवू नये’, यासाठी अनिष्ट शक्ती त्यात अडथळे आणत होती. याचे मला थोडे वाईट वाटले. नंतर मात्र मला आतून तीव्रतेने जाणवले, ‘परात्पर गुरु आधीपासूनच माझ्या अंतरंगात विराजमान आहेत आणि माझ्या माध्यमातून कार्य करण्यासाठी ते वाट पहात आहेत.’ माझ्या अंतरंगात परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवत असतांना माझ्यातील अहंकार, तसेच ‘मला सर्व कळते’, असे वाटणे, स्वतःला न्यून लेखणे, प्रतिमा जपणे, तुलना करणे, निष्कर्ष काढणे’ इत्यादी स्वभावदोष गळून गेल्याप्रमाणे वाटले. मला आतून केवळ शांत वाटत होते. या अनुभूतीमुळे ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व मी अनुभवू शकतो’, याची जाणीव माझ्यात निर्माण झाली.
३. नामजपादी उपाय करतांना क्षितिजावर परात्पर गुरु डॉक्टरांचा तोंडवळा दिसणे, त्यांनी ‘व्यापक व्हा’, असे सूक्ष्मातून सांगणे आणि त्या वेळी अनाहतचक्राच्या ठिकाणी ‘प्रीती’ची स्पंदने जाणवणे
आम्ही जून मासात झ्युरिक ते म्युनिक असा प्रवास करत होतो. त्या वेळी नामजपादी उपाय करतांना मधेच मी आकाशाच्या दिशेने पाहिले. मला क्षितिजावर परात्पर गुरु डॉक्टरांचा स्मितहास्य करत असलेला तोंडवळा दिसला. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘व्यापक व्हा’, असे सूक्ष्मातून सांगितल्याचे जाणवले. मला माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी ‘प्रीती’ची स्पंदने जाणवली. परात्पर गुरु डॉक्टरांची प्रीतीच मला माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी जाणवत होती. ‘ही स्पंदने आणि क्षितिजावर परात्पर गुरु डॉक्टरांचा तोंडवळा दिसणे’, यांत परस्पर संबंध आहे’, असे मला वाटले. ‘साधकांप्रती परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये असलेली प्रीती माझ्यातही येऊन ती व्यापक होईल, त्या वेळी माझ्याकडून समष्टी सेवा सहजपणे होईल’, असा विचार माझ्या मनात आला.
४. सद्गुरु सिरियाक वाले यांच्यात परात्पर गुरु डॉक्टरांप्रमाणेच प्रीती असल्याचे जाणवणे
मी सद्गुरु सिरियाक वाले यांचे निरीक्षण करत होतो. आम्हाला प्रवासात भेटायला येणार्या साधकांशी ते पुष्कळ प्रेमाने वागत होते. त्या वेळी मला वाटले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये जी प्रीती आहे, ती सद्गुरु सिरियाकदादा यांच्यातही आहे.’ त्यांच्यात असलेली परात्पर गुरु डॉक्टरांची प्रीती घेऊनच ते सर्व साधकांना भेटतात. त्यामुळे ‘सद्गुरु सिरियाकदादा काय बोलतात ?’, यापेक्षा ‘त्यांच्यातील या प्रीतीनेच सर्व जण भारावून जातील’, असे मला वाटले. यावरून मला उपरोक्त अनुभूतीचा अर्थ समजला.
५. ‘समष्टी सेवेच्या माध्यमातून गुरुसेवा करण्याची सिद्धता झाल्यावर गुरुच साधकात व्यापकत्व निर्माण करतात’, असे जाणवणे
ज्या वेळी आपण समष्टी सेवेच्या माध्यमातून गुरूंची सेवा करण्यास सिद्ध होतो, त्या वेळी गुरुच समष्टीला आवश्यक असणार्या गुणांचे संवर्धन करून साधकांमध्ये व्यापकत्व निर्माण करतात. ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हे परात्पर गुरु डॉक्टरांचे ध्येय आहे आणि ते परात्पर गुरु डॉक्टरच साधकांच्या माध्यमातून पूर्ण करणार आहेत’, हे मला शिकायला मिळाले.
६. ‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’साठी साधक आणि संत घडवणे’, या परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पाविषयी सद्गुरु सिरियाक वाले सांगत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवून भावजागृती होणे
‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’साठी साधक आणि संत घडवणे’, या परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पाविषयी सद्गुरु सिरियाक वाले येथील साधकांना सांगत होते. त्या वेळी आम्हा सर्वांना तेथे परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवले आणि आमची भावजागृती झाली. ‘एकदा साधकाला आपलेसे केल्यावर परात्पर गुरु डॉक्टर त्याला कधीच अंतर देत नाहीत’, हे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे वाक्य मला आठवले. त्यानंतर ‘परात्पर गुरु डॉक्टर सर्व साधकांवर प्रीती आणि कृपा यांचा वर्षाव करत आहेत’, असे मला जाणवले.’
– श्री. कार्ल बारवित्स्की, जर्मनी
संकलक : (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (ऑगस्ट २०२०)
|