|
|
संभाजीनगर – जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील ग्रामपंचायतीमधील शिपाई आणि आणखी एक व्यक्ती पोलीस पाटील महिलेला वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करत होती. याविषयी महिलेने सिल्लोड ग्रामीण पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महिलेने १० डिसेंबर या दिवशी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २ आरोपींना लगेच जामीन मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आरोपींच्या घरावर ११ डिसेंबरच्या रात्री आक्रमण केले.
१. पोलीस पाटील महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी ‘व्हिडीओ’ करत तिची व्यथा त्यात मांडली होती.
२. या व्हिडिओमध्ये महिलेने ‘त्रासाविषयी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार देण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी याकडे कानाडोळा केल्यामुळे टोकाचे पाऊल उचलले’, असा आरोप केला होता.
३. महिलेच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी २ आरोपींना अटक केली; मात्र त्यांना लगेच जामीन मिळाला.
४. या प्रकरणात गंभीर गुन्हे नोंद केले नसल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांची २ वाहने फोडून आरोपींच्या घरांंची नासधूस केली. (हे प्रकरण गंभीर असतांना पोलिसांनी आरोपींवर गंभीर गुन्हे का नोेंद केेले नाहीत ? यातून पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना ? अशी शंका ग्रामस्थांना आल्यास आश्चर्य वाटायला नको. – संपादक)
५. याच वेळी ग्रामस्थांनी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या दंगल नियंत्रण पथकाला दमदाटी केली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना रात्री उशिरा हवेत गोळीबार करावा लागला.
६. या घटनेत १ अधिकारी आणि ३ कर्मचारी घायाळ झाले आहेत. पोलिसांच्या २ वाहनांची हानी झाली असून ५५ ग्रामस्थांना कह्यात घेतले आहे.
दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करू ! – सुभाष देसाई, पालकमंत्रीपालकमंत्री सुभाष देसाई या घटनेविषयी म्हणाले, ‘‘केळगाव येथे झालेल्या घटनेची चौकशी चालू करण्यात आली आहे. या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी होईल. कुणालाही सोडले जाणार नाही, तसेच यात पोलीस दोषी असतील, तर त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.’’ |