जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे स्थानांतर तात्काळ रहित करण्याची मागणी

सावंतवाडी – जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे तडकाफडकी स्थानांतर करण्यात आले आहे. त्यांच्या काळात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती, तसेच नियमानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांचे स्थानांतर ३ वर्षे करता येत नाही. असे असतांनाही केवळ २ मासांतच कोणतेही कारण नसतांना किंवा त्यांनी विनंती केली नसतांनाही त्यांचे स्थानांतर संभाजीनगर (औरंगाबाद) येथे का करण्यात आले ? अशीच तत्परता भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी का दाखवण्यात आली नाही ?, असा प्रश्‍न युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांचे ठाणे येथे स्थानांतर झाल्यानंतर त्यांच्या जागी डॉ. श्रीमंत चव्हाण यांची दोन मासांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती झाली होती. नुकतीच त्यांनी जिल्ह्यातील एका खासगी डॉक्टरच्या रुग्णालयावर धाड घातली होती. या वेळी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला होता. तसेच जिल्ह्यातील काही खासगी डॉक्टरांनी डॉ. चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे राजकीय दबावापोटी त्यांचे स्थानांतर करण्यात आल्याची चर्चा जिल्ह्यात होत होती. डॉ. चव्हाण यांनीही स्थानांतराची मागणी केली नसल्याचे सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर सूर्याजी यांनी ‘डॉ. चव्हाण यांचे स्थानांतर रहित करा अन्यथा आंदोलन करू’, अशी चेतावणी प्रशासनाला दिली आहे.