आंबोली येथे ११ डिसेंबरला ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा होणार

पर्वतपूजन आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

वैभववाडी – ११ डिसेंबर या ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिना’च्या दिवशी सकाळी १० वाजता सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील महादेवगड पॉईंट येथे ‘माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ संस्थेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या वेळी पर्वतपूजन आणि मार्गदर्शन असे कार्यक्रम होणार आहेत.

मानवासह सर्व जीवसृष्टीमधील सजिवांच्या जडणघडणीमध्ये पर्वतांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. पर्वतांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासह सृष्टीतील त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनोने) वर्ष २००२मध्ये ‘११ डिसेंबर’ हा ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ म्हणून घोषित केला. तेव्हापासून हा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये पर्वत आणि डोंगर यांना अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांच्या विधीवत् पूजनाची परंपरा आहे. या पार्श्‍वभूमीवर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ बैठकीत सर्व जिल्हा संघटना आणि संस्था यांनी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार ‘माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ संस्थेच्या वतीने पहिला कार्यक्रम शुक्रवार, ११ डिसेंबरला आंबोली येथे होणार आहे. या दिवशी श्री. प्रकाश नारकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्वतपूजन आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या वेळी या क्षेत्रातील तज्ञ बाबला अल्मेडा, हेमंत ओगले आणि डॉ. बापू भोगटे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील गिरीप्रेमी, दुर्गप्रेमी, तसेच निसर्गप्रेमी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.