दळणवळण बंदीनंतर चालू झालेल्या शाळांमध्ये काय शिकवायचे याविषयी शिक्षकांचा गोंधळ !

मुलांना शाळा चालू झाल्यानंतर काय शिकवायचे आणि पहिल्या सत्राचे मूल्यमापन कसे करावे हे शाळांना का विचारावे लागते ? प्रशासनाने हे स्वतःहून का केले नाही ?

पुणे – राज्यात २३ नोव्हेंबरपासून इयत्ता ९ वी ते १२ वीच्या ११ सहस्र ३२२ शाळा चालू झाल्या आहेत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत आहे. शाळांमध्ये निश्‍चित काय शिकवायचे याविषयीचे धोरण सरकारने जाहीर केलेले नाही. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या पहिल्या सत्राच्या अभ्यासाची उजळणी घ्यावी ? कि पुढील दुसर्‍या सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करावा याविषयी शिक्षकांचा गोंधळ उडाला आहे. पहिल्या सत्राचे मूल्यमापन कसे करायचे याविषयी सरकारनेे धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने केली आहे. (गोंधळाची स्थिती निर्माण होण्यासाठी प्रशासनच उत्तरदायी आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक)