१२ लाख रुपयांची अवैध मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

सावंतवाडी – गोव्याहून लातूरच्या दिशेने जाणार्‍या ट्रकमधून पोलिसांनी १२ लाख ६७२ रुपयांच्या गोवा बनावटीच्या मद्यासह ११ लाख रुपयांचे वाहन, असा एकूण २३ लाख ६७२ रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला. या प्रकरणी गोपाळ वाघबळ ढोमसे (लातूर) आणि सतीश कांबळे (देगलूर, नांदेड) या दोघांना अटक केली. या दोघांना येथील न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी बजावली आहे.

ट्रकच्या हौद्यात बनवलेल्या चोरकप्प्यातून ही वाहतूक केली जात होती. जिल्हा मुख्यालय पोलीस आणि बांदा पोलीस यांनी ७ डिसेंबरला पहाटे बांदा पथकर नाक्यावर ही कारवाई केली. (सातत्याने गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक होत असल्याच्या घटना उघड होत आहेत. पोलिसांनी कारवाई केली, तरीही हे प्रकार चालूच आहेत. याचा अर्थ मद्याची अवैध वाहतूक करणार्‍यांवर या कारवाईचा वचक राहिलेला नाही, असा होतो. हे प्रकार थांबण्यासाठी आता गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या सरकारांनी ठोस उपाययोजना केली पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे. – संपादक)