जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव; भारताला प्रथमच मिळाला मान
सोलापूर – युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईझ’ (पुरस्कार) आज जाहीर झाला. सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार जाहीर झाला. लंडन मधील ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी या पुरस्कारची अधिकृत घोषणा केली. हा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.
WATCH: Indian village teacher Ranjitsinh Disale wins the Global Teacher Prize 2020 pic.twitter.com/BTepYV3ipm
— Reuters India (@ReutersIndia) December 3, 2020
जगभरातील १४० देशांतील १२ सहस्रांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसलेगुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची नोंद घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
साभार : यू ट्यूब
डिसले गुरुजींच्या व्यापक शैक्षणिक दृष्टिकोनाची चुणूक
पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजितसिंह डिसले यांनी जाहीर केले आहे. डिसले गुरुजींच्या या व्यापक शैक्षणिक दृष्टिकोनामुळे तब्बल ९ देशांतील सहस्रो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते ‘टीचर इनोव्हेशन फंडा’करीता उपयोगात आणणार आहेत. त्यामुळे शिक्षकांमधील नव उपक्रमशिलतेला निश्चितच चालना मिळेल.