कणकवली शहरात मुंबई-गोवा महामार्गाची हद्द निश्‍चित न झाल्यास महामार्गाचे काम बंद पाडणार ! – रूपेश नार्वेकर, नगरसेवक

कणकवली नगरपंचायतीतील विरोधी पक्षाचे नगरसेवक रूपेश नार्वेकर

कणकवली – शहरातून जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे; मात्र महामार्गाच्या दोन्ही बाजूंना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाच्या हद्दीचे ‘नीस’ (हद्द समजण्यासाठीचे दगड) लावलेले नाहीत. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना अवैध बाधकामे होत असून शहर बकाल होऊ लागले आहे. याविषयी नगर पंचायत प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरण यांच्याशी चर्चा करणार आहोत. १५ दिवसांत प्राधिकरणाने हद्दीचे नीस न बसवल्यास महामार्गाचे काम बंद पाडू, अशी चेतावणी कणकवली नगरपंचायतीतील विरोधी पक्षाचे नगरसेवक रूपेश नार्वेकर यांनी दिली आहे. (प्रत्येक गोष्ट लोकप्रतिनिधी किंवा जनतेने लक्षात आणून द्यावी लागत असेल, तर प्रशासन काय करते ? –  संपादक)

शहरात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. या कामावरून शहरात अनेक वेळा वाद निर्माण झाले आहेत. तरीही महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सातत्याने गलथानपणा करत आहेत. त्याचा फटका शहराच्या सौंदर्याला बसत आहे. महामार्गाच्या मध्यरेषेपासून दोन्ही बाजूला २२.५ मीटर याप्रमाणे महामार्गाचे आरेखन आहे. त्याच्या हद्दीवर (महामार्ग नियंत्रण रेषा) महामार्ग प्राधिकरणाने नीस न लावल्याने ही भूमी महामार्ग प्राधिकरण यांनी रितसर खरेदी करूनही त्यावर अवैध बांधकामे केली जात आहेत. महामार्ग चौपदरीकरणात ज्यांची संपत्ती गेली आणि ज्यांनी त्याची भरपाई घेतली, ते देखील महामार्ग प्राधिकरण हद्दीत नव्याने बांधकामे करत आहेत. त्यामुळे महामार्ग हद्दीच्या आरेखनाचे नीस १५ दिवसांत बसवावेत. शहराचे जलस्रोत सुरक्षित आणि स्वच्छ असतील याची दक्षता घ्यावी. शहरातील दोन्ही नद्यांच्या पात्रात अनधिकृत बांधकाम होणार नाही, याचे दायित्व नगरपंचायतीने घ्यावे आणि तसा अहवाल सादर करावा, अशा आमच्या मागण्या आहेत. या मागण्यांविषयी महामार्ग प्राधिकरण आणि नगरपंचायत प्रशासन यांच्याशी पत्रव्यवहार केला जाणार असून मागण्या मान्य न झाल्यास नागरिकांच्या साथीने तीव्र आंदोलन करून महामार्गाचे काम बंद पाडू, अशी चेतावणी नार्वेकर यांनी दिली आहे.