ओल्ड गोवा परिसरात चर्चपेक्षा उंच इमारती येऊ नयेत, यासाठी हस्तक्षेप करण्याविषयी विजय सरदेसाई यांचे युनेस्को आणि आयकोमॉस संस्थांना पत्र

(म्हणे) ‘गोव्याच्या भविष्यकाळासाठी ओल्ड गोव्याचे रक्षण करावे!’

पणजी, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी युनेस्को, वर्ल्ड हेरिटेज सेंटर आणि आयकोमॉस (इंटनॅशनल काऊन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अ‍ॅण्ड साईट्स) या संस्थाना पत्र पाठवून ओल्ड गोवा परिसरात उंच इमारती, तसेच बांधकाम प्रकल्प उभारण्यास शासन अनुमती देईल, अशी काळजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे गोव्याचा इतिहास जपण्यासाठी या संस्थांनी यात हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली आहे.

सरदेसाई यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे,

१. ‘‘गोवा शासनाच्या प्रशासकीय धोरणामुळे भविष्यात ओल्ड गोव्याजवळ विकासकामे वाढणार आहेत. त्यामुळे गोव्याचा इतिहास जपण्यासाठी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी एकत्र यावे. गोव्यामध्ये ‘ओल्ड गोव्याला’ एक वेगळे स्थान आहे. ‘ओल्ड गोवा’ हे धर्मनिरपेक्षतेच्या (सेक्युलेरिझम्च्या) संकल्पनेचे प्रतिनिधित्व करते. (धर्मनिरपेक्षतेचे कि धर्मांधतेचे ? ज्या पोर्तुगिजांनी छळाबळाने हिंदूंचे धर्मांतर केले, हिंदूंची देवळे पाडून चर्च बांधले, त्या पोर्तुगिजांनी बांधलेल्या जुने गोवे येथील चर्च धर्मनिरपेक्षतेचे प्रतिनिधित्व कसे करतील ? गोव्यातील किती हिंदू ही संकल्पना मानतात ? – संपादक)

२. वर्ष १९८६ मध्ये ‘ओल्ड गोवा’ हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. बसिलिका ऑफ बॉम जिझस, सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी चर्च, से कॅथेड्रल, सेंट केजेटन चर्च आणि सेंट आगुस्तिन चर्च ही चर्चेस १५ व्या शतकात बांधली आहेत. ती केवळ गोव्यातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्मारके नसून गोव्यातील अनेक कॅथॉलिकांची त्यांच्या धर्माविषयी अन् संस्कृतीविषयी श्रद्धा वाढवणारी श्रद्धास्थाने आहेत. (असे असले, तरी ही स्मारके येथील हिंदूंना त्यांच्या पूर्वजांवरील अत्याचारांची आठवण करून देतात आणि त्यांना त्याचा क्लेश होतो ! – संपादक)

३. २० नोव्हेंबर २०२० या दिवशी शासनाने ओल्ड गोवा येथील ‘इला व्हिलेज’ ही जागा ग्रेटर पणजी नियोजन आणि विकास खात्याच्या अधिकाराखाली घेतल्याचे पाहून मी आश्‍चर्यचकीत झालो. हे युनेस्कोने १९८६ या वर्षी ठरवलेल्या क्षेत्रात केलेेले अतिक्रमण आहे.

४. युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शासन वेगवेगळ्या व्यापारी क्षेत्रामध्ये ३० मीटर उंचीच्या इमारतींसाठी अनुमती देऊ शकते. गोव्यातील लोक अन् संस्कृती यांची बाजू मांडणे, या दृष्टीने आम्ही हा प्रश्‍न स्थानिक लोकांकडे उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोव्याचे नगर नियोजन मंत्री बाबू कवळेकर यांनी ३ डिसेंबरपूर्वी म्हणजे ‘सेंट फ्रान्सिस झेवियर फिस्ट’च्या आधी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.

५. मी युनेस्को, इकोमॉस या संस्थांना विनंती करत आहे की, त्यांनी गोव्याच्या भविष्यकाळासाठी ओल्ड गोव्याचे रक्षण करावे. (गोव्याचा भविष्यकाळ या चर्चवर अवलंबून नाही ! – संपादक) आंतरराष्ट्रीय संस्थांनी गोव्याचा इतिहास सुरक्षित ठेवण्यासाठी गोव्यातील जनतेच्या बाजूने उभे रहावे.’’ (पोर्तुगिजांनी ख्र्रिस्ती मिशनर्‍यांच्या साहाय्याने गोव्यातील हिंदूंचे छळाबळाने धर्मांतर केले, धर्मांतर न करणार्‍यांना याच ओल्ड गोवा परिसरात जिवंत जाळूनच नव्हे, तर अन्य अनेक जिवंतपणी मरणप्राय यातना देऊन ठार मारले. ख्रिस्त्यांचा हा क्रूर इतिहास आणि त्यातही गोव्यातील हिंदूंनी त्यांच्याविरुद्ध लढा देत टिकवून ठेवलेली येथील हिंदु संस्कृती, हा गोव्याचा इतिहास आहे ! – संपादक)