लव्ह जिहादची अनेक प्रकरणे उघडकीस येत असतांना शासनाने जनतेची मागणी तत्परतेने पूर्ण करावी !
नगर – प्रेमाच्या नावाखाली अनेक मुली आणि महिला यांचे जीवन उद्ध्वस्त करणार्या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात उत्तरप्रदेशात एका अध्यादेशाद्वारे लव्ह जिहाद कायदा लागू करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही असा कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन येथील अधिकार्यांची भेट घेऊन राज्य सरकारपर्यंत संघटनेचे म्हणणे पोचवण्याची विनंती केली आहे.
‘देशासह महाराष्ट्रात प्रेमाच्या नावाखाली मुली आणि महिला यांना लग्नाचे आमीष दाखवून सामूहिक बलात्कार, तसेच बळजोरीने धर्मांतर करणे यांसारख्या घटना सातत्याने घडत आहेत. अनेक मुली अपकीर्तीच्या धाकामुळे आणि अश्लील चित्रीकरण सार्वजनिक करण्याच्या धमकीमुळे अन्याय सहन करतात. त्यामुळे अशा अपप्रकारांचा बंदोबस्त करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारप्रमाणे कठोर कायदा महाराष्ट्र सरकारनेही करावा’, असे राष्ट्रीय वारकरी परिषदेने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. अभिषेक महाराज जाधव यांच्यासह पदाधिकारी ह.भ.प. संदीप महाराज जरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.