साधकांनो, आवश्यक त्या आरोग्य विषयक चाचण्या लवकर करून घ्या !

साधकांना सूचना

पूर, भूकंप, तिसरे महायुद्ध, कोरोना महामारीसारखी संकटे आदी आपत्काळ भविष्यात येणार असल्याचे सांगणारी आणि अशा काळात टिकून रहाण्यासाठी काय करावे याचे विवरण करणारी लेखमाला दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये दिनांक १४ जून ते ३० ऑगस्ट या काळात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या लेखांत वर्णन केल्याप्रमाणे अशा आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये आदी सहजपणे उपलब्ध होणे कठीण असते. त्याचप्रमाणे अ‍ॅलोपॅथीनुसार कराव्या लागणार्‍या, वैद्यांकडे जाऊन नुसते तपासून घेणे यापासून ते रक्त-लघवी यांसारख्या सामान्य चाचण्यांपासून ते सीटी स्कॅन, एंजिओग्राफी यांसारख्या अधिक किचकट प्रकारच्या विविध चाचण्या सहजपणे करून घेणेही कठीण असते, हे लक्षात येईल. त्यामुळे यांतील आवश्यक त्या चाचण्या योग्य ते वैद्यकीय मार्गदर्शन घेऊन लवकर करून घेणे योग्य ठरेल. या चाचण्या कोणी करून घ्याव्यात हा विचार करतांना पुढील सूत्रे उपयुक्त ठरतील.

१. ज्यांना सध्या काही किरकोळ तक्रारी आहेत; परंतु त्याकडे त्यांनी फारसे लक्ष दिलेले नाही.

२. ज्यांना काही दीर्घकाळ काळजी घ्यावा लागणारा विकार उदा. उच्च रक्तदाब, मधुमेह आहे.

२ अ. जो विकार आहे तो नियंत्रणात आहेत ना, हे पडताळण्यासाठी.

२ आ. अशा विकारांमुळे अन्य इंद्रियांवर परिणाम झाला आहे का, हे पडताळण्यासाठी.

२ इ. मूळ विकाराशी संबंधित नाही असे वाटणार्‍या काही किरकोळ शारीरिक तक्रारी असतील, तर त्याविषयी पडताळण्यासाठी.

३. ज्यांना नजिकच्या भविष्यात कधी तरी विशिष्ट तपासण्या करून घ्याव्यात, असे वैद्यांनी सांगितले आहे.

४. एखादा गंभीर विकार उपचारांनी सध्या बरा झालेला असला तरी परत उद्भवू शकतो असा विकार, उदा. एखाद्या प्रकारचा कर्करोग.

५. आहारपरत्वे, वयपरत्वे, व्यवसायपरत्वे अथवा अनुवंशिकता परत्वे स्वत:मध्ये काही विशिष्ट व्याधी अथवा विकार उत्पन्न होत नाही ना याची खात्री करण्यासाठी प्रतिबंधात्मक प्रकारच्या तपासण्या (हेल्थ चेकअप) करणे, उदा. ३० वर्षांहून अधिक वयोगटातील, तसेच ज्यांच्या पालकांपैकी एखाद्यास मधुमेह आहे, अशांनी त्यांना मधुमेहाचा प्रारंभ झाला आहे का आणि नसेल तर होण्याची शक्यता आहे का, हे पडताळणे, यासाठी रक्ताच्या तपासण्या करून घ्याव्यात.

– आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०२०)