मुंबई – २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेले पोलीस आणि जवान यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मरीन ड्राईव्ह येथील पोलीस परेड मैदानातील स्मारकाच्या ठिकाणी पोलीस आणि जवान यांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनीही श्रद्धांजली वाहिली. या वेळी हुताम्यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी हुतात्म्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. २६ नोव्हेंबर २०२० या दिवशी मुंबईवरील या सर्वांत मोठ्या आतंकवादी आक्रमणाला १२ वर्षे पूर्ण झाली.
आतंकवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल, ट्रायडेंट हॉटेल, कामा हॉटेल आदी ६ ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला. कराची येथून अत्याधुनिक शस्त्रांसह हे आतंकवादी आले होते. या आक्रमणात हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, अन्य पोलीस आणि नागरिक अशा १९७ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये ३४ परदेशी नागरिकांचाही समावेश होता. सुरक्षारक्षक आणि आतंकवादी यांमध्ये ६० घंटे चकमक झाली. या वेळी १० अतिरेक्यांपैकी अजमल कसाब या आतंकवाद्याला पोलिसांनी जीवंत पकडले. कसाबने केलेला गोळीबार स्वत:वर झेलूनही पोलीस हवालदार तुकाराम ओंबळे यांनी कसाबला सोडले नही. त्यामुळेच कसाबला जीवंत पकडणे शक्य झाले. कसाब याला जीवंत पकडल्यामुळे या आक्रमणातील पाकिस्तानचा सहभाग उघड झाला. कसाब याला पकडतांना तुकाराम ओंबळे हे हुतात्मा झाले. २१ नोव्हेंबर २०१२ या दिवशी कसाब याला फाशी देण्यात आली.