कोरोना महामारीच्या काळात कर्मचार्‍यांना वेतन आणि दिवाळी बोनस देणार्‍या कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाचे पंचक्रोशीतून कौतुक

नगर – पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या सर्व कर्मचार्‍यांना दिवाळीच्या बोनसचे वाटप देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनीलराव सानप, विश्‍वस्त आप्पासाहेब मरकड आणि मिलिंद चवंडके या कार्यरत विश्‍वस्तांनी सामाजिक बांधीलकीच्या सद्भावनेतून केले. कोरोना महामारीच्या संकट कालावधीत मंदिरे बंद असूनही देवस्थानच्या सर्व कर्मचार्‍यांना महिन्याचे पूर्ण वेतन नियमितपणे सलग आठ महिने देण्याचे सत्कार्य या चौघांनी पार पाडले. ग्रामीण भागातील वस्तुस्थिती लक्षात घेऊन कर्मचार्‍यांच्या संख्येत घट किंवा वेतनकपात केली नाही. विश्‍वस्त या नात्याने कोरोनाकाळातील नियमांचे तंतोतंत पालन केले. त्याप्रीत्यर्थ पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

धर्मदाय उपायुक्त श्रीमती हिराताई शेळके यांनी देवस्थानचा आर्थिक कारभार मोठ्या विश्‍वासाने देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे आणि विश्‍वस्त मिलिंद चवंडके या दोघांच्या हाती सुपुर्द केला होता. नवनियुक्त विश्‍वस्त मंडळाने कारभार हाती घेतांना शिवशंकर राजळे आणि मिलिंद चवंडके यांच्या प्रामाणिक कार्याचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे, असे धर्मदाय उपायुक्त श्रीमती हिराताई शेळके यांनी सांगितले.

कोरोना महामारीच्या काळात श्री कानिफनाथ देवस्थानकडून करण्यात आलेले सामाजिक कार्य

१. दळणवळण बंदीच्या कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस खाते यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. कर्तव्यावर असलेले शासकीय अधिकारी आणि कर्मचारी, पोलीस बांधव, तसेच गरजूंना श्री कानिफनाथ देवस्थानकडून नाथप्रसाद पुरवण्याची सेवा करण्यात आली.

२. देवस्थानच्या पदाधिकार्‍यांच्या सूचनांनुसार देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड, कर्मचारी संजय मरकड, संतोष मरकड, अविनाश मरकड, सुरेश मरकड, विजय रासकर, अशोक मरकड, राधाकृष्ण मरकड, बबन मरकड, पाराजी मरकड, अर्जुन मरकड आणि शिवाजी मरकड यांनी या सामाजिक कार्यासाठी सर्व दक्षता घेत विशेष परिश्रम घेतले.

३. पाथर्डीमधील शासकीय रुग्णालय, आरोग्यमाता केंद्र, पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, सेतू कार्यालय यांसह रस्त्यामध्ये आढळणारे गोरगरीब, भुकेलेले अशा सर्वांनाच खाद्यपाकिटांचे वाटप करण्यात आले.

४. मढी परिसरातील रहिवाशांना मास्क आणि सॅनिटायझर यांचे वाटप करण्यात आले. देवस्थानकडे येणार्‍या रस्त्यांवर औषध फवारणी करण्यात आली.