कोरोनावरील लस लवकर येऊ दे, संपूर्ण जग कोरोनामुक्त होऊ दे !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे

शासकीय महापूजेला उपस्थित अजित पवार आणि त्यांच्या पत्नी, तसेच त्यांच्यासह उपस्थित मानाचे वारकरी श्री. आणि सौ. भोयर

पंढरपूर – कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि संपूर्ण जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री  विठ्ठलाच्या चरणी घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली.

१. या वेळी अजित पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचे आहे. वारकर्‍यांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद दिला त्यासाठी मी समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतो. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य लाभले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील, असा विश्‍वास आहे.

२. पवार यांच्या हस्ते मानाचे वारकरी श्री. कवडुजी नारायण भोयर आणि सौ. कुसुमबाई कवडुजी भोयर यांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा प्रवास सवलत पास देण्यात आला. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या दैनंदिनी २०२१चे प्रकाशन या वेळी करण्यात आले.

३. अजित पवार यांनी मुंबईवरील दहशतवादी आक्रमणाचा उल्लेख करून दहशतवाद्यांशी लढतांना हुतात्मा झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना वंदन केले. या हुतात्मा वीरांचा त्याग महाराष्ट्र नेहमी लक्षात ठेवेल, युवकांना देशासाठी लढण्याची प्रेरणा देईल, असा मला विश्‍वास आहे, असे ते म्हणाले.