रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार आणि रामभक्त सदानंद भस्मे महाराज (वय ७८ वर्षे) संतपदी विराजमान !

कीर्तनकारांना ‘संत’ म्हणून घोषित करण्याचा सनातन संस्थेच्या इतिहासातील पहिलाच आनंददायी क्षण !

पू. सदानंद भस्मे महाराज यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करतांना प.पू. दास महाराज

रामनाथी (फोंडा, गोवा) – रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार आणि रामभक्त सदानंद भस्मे महाराज हे २५ नोव्हेंबर २०२० या दिवशी संतपदी विराजमान झाले. येथील सनातनच्या आश्रमात प.पू. दास महाराज यांनी पू. सदानंद भस्मे महाराज यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. तीव्र शारीरिक त्रास होत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. भस्मे महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी पू. भस्मे महाराज यांचे शिष्य सर्वश्री शिवानंद, श्रीरंग, शंकर, प्रल्हाद आदी उपस्थित होते. या प्रसंगी पू. भस्मे महाराज यांच्या शिष्यांनी त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.

संत सहवास मिळण्यामुळे आपला उद्धार होतो ! – पू. सदानंद भस्मे महाराज

विश्‍वातील मोठे कार्य गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) करत आहेत. आजचा दिवस हा जीवन धन्य करणारा आहे. आज मला संतांचे दर्शन झाले, हे माझे भाग्य आहे. हा क्षण सणाप्रमाणे आहे; कारण संतसहवास मिळणे, हा दुर्लभ अन् अनमोल क्षण आहे. अशा क्षणांमुळे आपला उद्धार होतो. ज्याप्रमाणे परिसाने लोखंडाला स्पर्श केल्यावर त्याचे सोने होते, तसे माझे झाले. सनातन संस्था करत असलेल्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात आमचा सहभाग राहील, तसेच रामराज्य लवकर येईल, असे उद्गार पू. सदानंद भस्मे महाराज यांनी काढले.

३० सहस्र कोटी नामजप करणारे पू. भस्मे महाराज एकमेवाद्वितीय ! – प.पू. दास महाराज

आजपर्यंत इतिहासात ३० सहस्र कोटी नामजप कुणीही केलेला नाही. असे करणारे पू. भस्मे महाराज एकमेव आहेत. एवढ्या प्रमाणात नामजप करणारे पू. भस्मे महाराज हे स्वतः अवतारच आहेत.

प.पू. दास महाराज यांचे शिष्यांना मार्गदर्शन

‘वानरसेनेने ज्याप्रमाणे प्रभु श्रीरामांचा धर्मध्वज हाती धरला होता, त्याप्रमाणे आपण शिष्यांनीही धर्मकार्यात सहभागी व्हावे, असे मार्गदर्शन प.पू. दास महाराज यांनी पू. भस्मे महाराज यांच्या शिष्यांना केले. त्या वेळी पू. भस्मे महाराज आणि त्यांचे शिष्य यांनी ‘आम्ही प्रभु श्रीरामाला हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे आणि साधकांचे त्रास दूर करण्यासाठी प्रार्थना करू’, असे सांगितले.’

क्षणचित्र : पू. भस्मे महाराज यांचा संत म्हणून सन्मान केल्यावर वातावरणात सूक्ष्म सुगंध दरवळला. याची अनुभूती महाराजांच्या भक्तांनीही घेतली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘आतापर्यंत आपण कीर्तनकार सदानंद भस्मे महाराज यांना ‘कीर्तनकार’ म्हणून ओळखत होतो. आजपासून आपण त्यांना ‘संत भस्मे महाराज’ असे म्हणणार आहोत. अशा प्रकारे एका कीर्तनकाराला ‘संत’ म्हणून घोषित करण्याचा सनातन संस्थेच्या इतिहासातील हा पहिलाच अद्वितीय क्षण आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

संतपद घोषित झाल्यानंतर पू. भस्मे महाराज यांच्या सकारात्मक उर्जेच्या प्रभावळीत ४१ मीटर ५० सेंटीमीटर एवढी वाढ !

‘पू. भस्मे महाराज यांचे संतपद घोषित होण्यापूर्वी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’द्वारे त्यांच्या प्रभावळीची नोंद केली असता त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा नव्हती, तर सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २९.८० मीटर होती. त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ७१.३० मीटर एवढी झाली; म्हणजेच ४१ मीटर ५० सेंटीमीटर एवढी वाढली.’


पू. सदानंद भस्मे महाराज यांचा परिचय

‘रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार पू. सदानंद भस्मे महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे अंतरंगी भक्त आहेत. संत तुकाराम महाराज यांनी सूक्ष्मातून दिलेल्या ज्ञानाद्वारे पू. भस्मे महाराजांनी ६ वर्षांत ‘तुकाराम चैतन्य’ नावाचा कन्नड भाषेतील ग्रंथ लिहिला. पू. भस्मे महाराज यांना स्वामी रंगराव महाराज गुरु म्हणून लाभले. त्यांना बालपणापासून मृदंग, तबला, संवादिनी वाजवणे आदी कला उपजतच आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार पू. भस्मे महाराज रामनामाचा अखंड जप करतात, तसेच ते गावोगावी दासबोधासह अन्य आध्यात्मिक विषयांवर प्रवचने करतात. त्यांनी त्यांच्या शिष्यवृंदाच्या समवेत आतापर्यंत ३० सहस्र कोटी रामनामाचा जप केला आहे.’


हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि साधकांचे त्रास दूर व्हावेत, यासाठी पू. भस्मे महाराज यांच्या चरणी प्रार्थना करणारे प.पू. दास महाराज !

‘सनातन संस्था हिंदु राष्ट्राची स्थापना आणि धर्मजागृती यांचे कार्य करत आहे. त्यामध्ये तुम्ही सनातनचे ग्रंथ, पंचांग आदींचे वितरण करण्यासह विविध अंगाने सहभागी व्हा. सनातनच्या साधकांना होणारे त्रास, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रभु श्रीरामाला प्रार्थना करावी, अशी आपल्या (पू. भस्मे महाराज यांच्या) चरणी प्रार्थना आहे. तुम्ही साधकांना शक्ती प्रदान करा’, अशी प्रार्थना प.पू. दास महाराज यांनी पू. भस्मे महाराज यांच्या चरणी केली.


पू. भस्मे महाराज यांच्या शिष्यांनी त्यांच्याविषयी कथन केलेली गुणवैशिष्ट्ये

शिष्य श्री. शिवानंद

१. साधे रहाणीमान आणि लहानपणापासून भक्तीची ओढ

‘पू. भस्मे महाराजांचे रहाणीमान आणि वेशभूषा साधी आहे. त्यांच्या जन्मापूर्वी त्यांची आई अनुसूया आणि त्यांचे वडील रघुनाथ यांना त्यांच्या गुरूंनी सांगितले होते की, तुम्हाला एक मुलगा होईल की, जो पालखी चालवेल. त्या वेळी त्यांची आर्थिक स्थिती गरिबीची होती; पण भक्ती हेच जीवनअंग होते. महाराज लहानपणापासून शाळेतील मित्रांना रामायण, महाभारत यांच्या गोष्टी सांगायचे, तसेच त्यांनी दत्तजयंती उत्सवाच्या वेळी मित्रांसह पाळणा करण्याचा खेळ खेळायचे. यातून त्यांची भक्ती दिसून येते. त्या वेळी त्यांचे शिक्षक म्हणायचे की, हा (पू. भस्मे महाराज) सर्व मुलांना साधू बनवणार का ?

२. गुरुभेटीची तळमळ

अत्यंत गरीब परिस्थिती असतांना पू. भस्मे महाराज यांनी त्यांच्या बंधूंसह इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे जाऊन एक व्यवसाय चालू केला; पण त्यात यश येत नव्हते. त्या वेळी विजापूर येथील स्वामी रंगराव महाराज यांना पू. भस्मे महाराज यांनी पत्र लिहून स्थिती कळवली होती. त्या पत्राविषयी स्वामी रंगराव महाराज यांना सूक्ष्मातून आधीच कळले होते आणि महाराजांनी पू. भस्मे महाराज यांना पत्र पाठवून विजापूर येथे बोलवून घेतले. महाराजांनी पाठवलेले पत्र वाचून त्यांची तळमळ जागृत झाली आणि त्यानंतर ते अन् त्यांचे भाऊ या दोघांनी सायकलवर इचलकरंजी ते विजापूर असा प्रवास करून महाराजांची भेट घेतली. यावरून पू. भस्मे महाराज यांची गुरुभेटीची तळमळ दिसून येते.

३. संत तुकाराम महाराज यांचे चरित्र लिहिण्याची तळमळ

पू. भस्मे महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांचे चरित्र लिहिण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे त्यांच्याविषयी उपलब्ध असलेली अनेक चरित्रे अन् अभंग यांचा ६ वर्षे अभ्यास केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी केलेला संघर्ष, त्यांचे शेवटचे क्षण या सर्वांविषयीही त्यामध्ये विस्तृतपणे दिलेले आहे.

४. स्वामी रंगराव महाराज यांचे जीवनचरित्र दासबोधाच्या आधारावर भावपूर्ण लिहिणे

पू. भस्मे महाराज यांनी त्यांचे गुरु स्वामी रंगराव महाराज यांचे जीवनचरित्र लिहिले. त्यासाठी त्यांनी गुरूंच्या विविध ठिकाणच्या शिष्यांकडे जाऊन माहिती गोळा केली. त्यांचे जीवनचरित्र दासबोधाच्या आधारावर सिद्ध केले. ते जीवनचरित्र वाचून अनेकांची भावजागृती होते. अनेकांना ते चरित्र वाचल्यावर प्रत्यक्ष स्वामी रंगराव महाराज यांना अनुभवल्यासारखे जाणवते. कर्नाटकमधील संत स्वामी विरजानंद यांना त्यांच्या एका भक्तांनी हा चरित्रग्रंथ दिला, त्या वेळी त्यांनी तो पूर्ण वाचल्यावरच ठेवला. तो ग्रंथ वाचल्यावर स्वामी विरजानंद स्वतः पू. भस्मे महाराज यांना भेटायला रामपूरला आले आणि त्यांना आलिंगन दिले.’

श्री. श्रीरंग यांनी सांगितलेली पू. भस्मे महाराज यांच्या आई-वडिलांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

१. अंत्यसमयीही नामजप करणार्‍या पू. भस्मे महाराज यांच्या आई !

‘पू. भस्मे महाराज यांचे आई-वडील रामभक्त होते. त्यांची आई मनापासून रामनाम घ्यायची. आईच्या अंत्यसमयीही तिचा नामजप चालू होता. आईचे देहावसान झाल्यावर पू. भस्मे महाराज यांनी सर्वांना सांगितले की, कुणीही दुःख न करता तिच्या मुखात गंगाजल घालूया.

२. पू. भस्मे महाराज यांच्या वडिलांच्या देहावसनानंतरही त्यांच्या हातातील माळेतील मणी पुढे पुढे सरकणे

पू. भस्मे महाराज यांच्या वडिलांनी देहावसनाच्या दिवशी सांगितले होते की, मी रात्री १०.१५ वाजता देह ठेवणार आहे. त्याप्रमाणे त्यांचे प्राण गेल्यावर त्यांच्या हातातील जपमाळेचा एक-एक मणी पुढे पुढे आपोआप सरकत होता. या वेळी पू. भस्मे महाराज यांनी सांगितले की, त्यांचा आतून नामजप चालू आहे. आधुनिक वैद्यांनीही वडिलांच्या पार्थिवाच्या हातातील जपमाळ पुढे सरकत असल्याचे पाहून आश्‍चर्य व्यक्त केले.’


सनातनचे साधक श्री. राम होनप यांना जाणवलेली पू. भस्मे महाराज यांची गुणवैशिष्ट्ये

श्री. राम होनप

१. ‘पू. भस्मे महाराज यांच्या दर्शनासाठी गेलो असता मी त्यांच्या बाजूला बसलो. त्या वेळी मला त्यांच्याकडून चैतन्य येत असल्याचे जाणवले. त्या वेळी माझ्याकडून आपोआप नामजप होत होता.

२. साधना करतांना मन शांत ठेवण्यासाठी आणि अंतर्मुखता राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतात; पण पू. भस्मे महाराज यांच्या सहवासानेच मन शांत रहाणे आणि अंतर्मुखता यांची अनुभूती आली.

३. समर्थ रामदासस्वामी यांनी त्यांच्या लिखाणात म्हटले आहे की, १३ कोटी नामजप केल्यावर प्रभु श्रीरामाचे दर्शन होते. पू. भस्मे महाराज यांनी ३० सहस्र कोटी नामजप भक्तांसह केला असून ते अखंड अनुसंधानात असतात. त्यांना आता सर्वत्र प्रभु श्रीराम दिसतो.

४. पू. भस्मे महाराज स्वतः साधना करतात आणि अध्यात्म जगतात. ते भक्तांकडून साधना करवून घेतात. ते प्रसिद्धपराङमुख आहेत.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

पू. भस्मे महाराज यांची हिंदु राष्ट्र आणण्याविषयीची तळमळ

‘पू. भस्मे महाराज यांनी सांगितले की, परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीरामस्वरूप आहेत. महाराजांना संस्थेचे कार्य समजल्यावर ते म्हणाले की, मी गावागावांत जाऊन हिंदु राष्ट्राविषयी सांगीन. माझ्याकडे तेवढी शक्ती नाही; पण मी प्रयत्न करीन.’ – श्री. सोमनाथ मल्ल्या, सनातनचे साधक

 सनातन आश्रमाविषयी पू. भस्मे महाराजांच्या शिष्यांनी काढलेले गौरवोद्गार

‘रामनाथी येथील आश्रमातील साधकांचे रहाणीमान सदाचारी आहे, तसेच आश्रमात शिस्त आहे. याचसमवेत येथील साधक रामराज्य आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे रहाणीमान आम्ही अन्य कोणत्याही आश्रमात पाहिलेले नाही. आम्ही आमच्या सर्व भक्तांना रामराज्य येण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगू, तसेच त्यासाठी प्रयत्न करू.’

– श्री. शिवानंद, रामपूर, कर्नाटक

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक