परात्पर गुरु डॉ. आठवले यांची निर्गुणाकडे वाटचाल होत असल्याविषयी साधकाला आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. देवद आश्रमातील साधक गुरुदेवांच्या निर्गुण रूपाची अनुभूती घेत असल्याचे जाणवणे

‘२६.२.२०१९ या दिवशी मी सेवेनिमित्त देवद आश्रमात गेलो होतो. तेव्हा माझ्या मनात पुढील विचार आला. ‘रामनाथी आश्रमातील साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जवळ असतात, म्हणजे ते गुरुदेवांचे दर्शन सगुण रूपात घेतात, तर देवद आश्रमातील साधक दूर अंतरावर असून ते सेवेच्या माध्यमातून आणि विविध भाव ठेवून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निर्गुण रूप अनुभवतात. गुरुदेवांनी देवद आश्रमातील साधकांना ‘निर्गुणाची अनुभूती कशी घ्यायची ?’, हे आधीच शिकवले आहे आणि साधक तसे प्रयत्न नेहमीच करत आहेत.’

श्री. अपूर्व ढगे

२. निर्गुणाकडे वाटचाल करत असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आता निर्गुणातून अनुभवायचे असल्याची जाणीव होणे

भृगु महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आता निर्गुणाकडे वाटचाल होत आहे. आता त्यांच्या पादुकाच साधकांना शक्ती देणार आहेत, म्हणजेच ‘आता परात्पर गुरु डॉ. आठवले यांना निर्गुणातून अनुभवायचे आहे’, याची मला जाणीव झाली. ‘सगुणापेक्षा निर्गुण श्रेष्ठ’ याची अनुभूती देवद आश्रमातील साधक नेहमीच घेत आहेत. देवद आश्रमातील साधकांकडून ‘निर्गुणाची अनुभूती कशी घ्यायची ?’, हे मला तेव्हा शिकायला मिळाले.

३. देवद आश्रमाच्या ठिकाणी गुरुदेवांचे चरण दिसून तेथील साधक सदैव गुरुचरणी रहात असल्याचे जाणवणे

वरील विचार आल्यानंतर २ मिनिटे माझे मन निर्विचार होऊन मला पुष्कळ आनंद होत होता. मला डोळ्यांसमोर देवद आश्रम आणि त्याच्या सभोवतालचा परिसर दिसला. नंतर लगेचच मला देवद आश्रमाच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मोठे चरण दिसले. त्या वेळी माझ्या अंगावर रोमांच येऊन पुष्कळ भावजागृती झाली. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांचे निर्गुण चैतन्य सर्वत्र पसरले आहे’, असे मला जाणवले. तेव्हा ‘देवद आश्रमातील साधक सदैव गुरुचरणी रहातात’, असा विचार येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. आश्रमाच्या ठिकाणी मला गुरुदेवांचे चरण दिसले. यावरून ‘गुरूंच्या चरणांमध्ये किती अफाट शक्ती आहे !’, हेही माझ्या लक्षात आले.

४. ‘प्रत्येक गोष्टीमध्ये गुरुदेवांचे अस्तित्व पहाणारे साधक आता सर्वत्र त्यांचे चरण पहातील’, असे वाटणे

गुरुपादुकांची प्रतिष्ठापना प्रत्येक आश्रमात होणार आहे आणि यापुढे साधकांना त्यांमधूनच शक्ती मिळणार आहे. गुरुदेवांच्या ठिकाणी आता त्यांच्या पादुकाच साधकांसाठी सर्वस्व आहेत. आधी साधक प्रत्येक गोष्टीमध्ये गुरुदेवांचे अस्तित्व पहायचे; परंतु आता साधक ‘गुरुदेवांच्या ठिकाणी सर्वत्र त्यांचे चरणच पहातील’, असे गुरुदेवांनी वरील अनुभूतीतून सांगितले असल्याचे मला जाणवले. त्यामुळेच ‘मला आश्रमाच्या ठिकाणी गुरुचरण दिसले’, असे मला वाटले.

५. चराचरात गुरुपादुकांचे अस्तित्व असून स्वतःच्या हृदयातही त्या स्थापित झाल्याचे जाणवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले निर्गुणाकडे वाटचाल करत असतांना साधकांना चराचरात पादुकांचे अस्तित्व जाणवते. यातून मला गुरुपादुकांच्या शक्तीची जाणीव झाली. ‘चराचरात गुरुदेवांचे अस्तित्व आहे’, असे म्हणण्यापेक्षा ‘आता चराचरात गुरुपादुकांचे अस्तित्व आहे’,  असे मला वाटते. ‘माझ्या हृदयातही गुरुपादुका स्थापित झाल्या आहेत’, असे मला वाटते. आता` मी ‘प्रत्येक वस्तूमध्ये गुरुपादुका आहेत’, असा भाव ठेवतो.

६. गुरुपादुका सदैव स्वतःसमवेत आणि हृदयात असल्याचे जाणवल्याने कुठेही गेल्यावर रामनाथी आश्रमातच असल्याचे वाटणे

प्रथम मला नेहमी रामनाथी आश्रमातच रहावेसे वाटायचे. इतर कुठेही रहायची माझ्या मनाची सिद्धता नसे; परंतु ‘गुरुपादुका प्राप्त झाल्या आणि मला गुरुदेवांचे चरण प्रत्येक गोष्टीमध्ये दिसू लागले. तेव्हापासून ‘माझी ही अपेक्षा अल्प झाली असल्याचे माझ्या लक्षात आले. मी सेवेनिमित्त आणि काही कारणानिमित्त घरी गेलो होतो. तेव्हाही मला ‘मी रामनाथी आश्रमापासून दूर आहे’, असे एकदाही वाटले नाही. याचे कारण म्हणजे गुरुपादुका माझ्या समवेत आणि माझ्या हृदयात आहेत.

हे मला अनुभवता आले, यासाठी गुरुदेव आणि भृगु महर्षि यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. अपूर्व ढगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.२.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक