विवाहानंतर साधना, गुरुसेवा अन् ईश्‍वरप्राप्ती हा केंद्रबिंदू ठेवल्यास आनंदी जीवन जगता येऊन ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणे सुलभ होते !

विवाहानंतर स्वभावदोष आणि प्रारब्ध यांमध्ये अडकण्यापेक्षा साधना, गुरुसेवा अन् ईश्‍वरप्राप्ती हा केंद्रबिंदू ठेवल्यास आनंदी जीवन जगता येऊन ईश्‍वरप्राप्तीसाठी अपेक्षित प्रयत्न करणे सुलभ होते !

​‘एकदा माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली. त्या वेळी त्यांनी माझी कन्या सौ. वैदेही गौडा हिच्याविषयी विचारपूस केली. तेव्हा मी सांगितले, ‘‘विवाहानंतर पहिल्या वर्षी तिला श्री. गुरुप्रसाद गौडा (जावई) यांच्याकडून अपेक्षा असायच्या. ‘त्याने तिला भ्रमणभाष करावा, बोलावे, वेळ काढावा, वेळ द्यावा’, अशा तिच्या अपेक्षा असत. त्यामुळे साधना आणि सेवा वरवरचे असायचे; पण आता ती ‘तिचा विवाह झाला आहे’, हे विसरली आहे’, असे वाटते; कारण आता तिच्याशी बोलतांना विवाहापूर्वी जशी ती सेवा आणि साधना करायची, तसे करत असल्याचे लक्षात येते.

​आता या वर्षभरात असे प्रसंग घडले नाहीत; कारण आता ती पू. रमानंदअण्णा यांच्या समवेत सेवा करू लागली आहे. त्यांच्याशी ती मनमोकळेपणाने बोलते आणि साधनेविषयी त्यांच्याकडून मार्गदर्शनही घेते. ‘आता तिच्या गुरुप्रसादविषयीच्या अपेक्षा संपल्या आहेत’, असे वाटते. त्यावर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘छान ! असेच अपेक्षित असते. विवाह झालेल्या किंवा करू इच्छिणार्‍या सर्वांनाच या प्रसंगातून शिकायला मिळेल.’’

शिकायला मिळालेले सूत्र ​

साधना करू इच्छिणारे, पूर्णवेळ साधना करणारे वा व्यावहारिक जीवन जगणार असोत, विवाहानंतर स्वभावदोष आणि प्रारब्ध यांमध्ये अडकण्यापेक्षा साधना, गुरुसेवा अन् ईश्‍वरप्राप्ती हा केंद्रबिंदू ठेवल्यास आनंदी जीवन जगणे शक्य होऊन ईश्‍वरप्राप्तीसाठी अपेक्षित प्रयत्न करणे सुलभ होते.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.