मिझोराममध्ये मांसासाठी होणार्‍या कुत्र्याच्या कत्तलीवर बंदी

मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे सरकार आहे. मांसाहारामुळेच जगभरात विविध विषाणूंचा प्रादुर्भाव होऊन सहस्रो लोकांचा मृत्यू झाला आहे. हे ठाऊक असूनही तेथील राज्य सरकारला हा निर्णय घेण्यास विलंब का लागला ?

ऐझवल (मिझोराम) –  मिझोराम राज्याने कुत्र्याच्या मांसाचा व्यापार बंद करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. कत्तलीसाठी उपयुक्त जनावरांच्या परिभाषेतून कुत्र्यांना काढून टाकण्यासाठी कायद्यात पालट केला आहे, अशी माहिती ‘ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनल/इंडिया’ (एच्.आय.एस्./इंडिया) या संघटनेने दिली आहे. मिझोराम विधानसभेने ‘पशू कत्तल विधेयक २०२०’ एकमताने संमत केले आहे. त्यात हा पालट करण्यात आला आहे. एच्.आय.एस्./इंडिया या संघटनेने मिझोराम सरकारला अमानुष आणि अवैध असलेल्या कुत्र्याच्या मांसाचा व्यापार थांबवण्याचा आग्रह केला आहे.

संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या अन्न सुरक्षा नियमांतर्गत कुत्र्यांच्या मांसाचा वापर प्रतिबंधित आहे. तथापि याची कार्यवाही फारशी केली जात नाही आणि प्रतिवर्षी सहस्रो कुत्रे रस्त्यावरून अवैधरित्या पकडले जातात किंवा घरातून चोरी करण्यात येतात. म्यानमार आणि बांगलादेश यांसारख्या शेजारच्या देशांतूनही कुत्र्यांची अवैधरित्या आयात झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. कुत्र्यांची अमानुषतेने वाहतूक आणि कत्तल केल्याने भारतीय दंड संहिता अन् अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफ्.एस्.एस्.ए.आय.च्या) अनेक तरतुदींचे उल्लंघन झाले आहे.