नेमळे येथे चारचाकीच्या अपघातानंतर सिंधुदुर्गात गोमांससदृश मांसाची वाहतूक होत असल्याचे उघड

पसार होण्याचा प्रयत्न करणारा चालक सद्दाम यलवट्टी याला ग्रामस्थ आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांच्या सतर्कतेमुळे अटक अन् पोलीस कोठडी

प्रतिकात्मक चित्र

सावंतवाडी – मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बगलमार्गावरील फौजदारवाडी, नेमळे येथे एक चारचाकी वाहन दुभाजकाला धडकून उलटल्याची घटना  १० जुलै या दिवशी सकाळी घडली. या अपघातानंतर चालक सद्दाम दलावसाब यलवट्टी (वय ३१ वर्षे, रहाणार गोवा, मूळ रहाणार कर्नाटक) याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र स्थानिक नागरिक आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी पाठलाग करून त्याला पकडले अन् पोलिसांच्या कह्यात दिले; मात्र या अपघातानंतर चारचाकीमध्ये ६०५ किलो गोमांस सदृश्य मांस सापडले. त्यामुळे जिल्ह्यात गोमांसाची तस्करी केली जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले. या प्रकरणी अटक केलेला चालक सद्दाम यलवट्टी याला येथील न्यायालयाने १० जुलै या दिवशी ३ दिवसांची पोलीस कोठडी बजावली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. कह्यात घेतलेल्या मांसाचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक चौकशीत ही चारचाकी कर्नाटक राज्यातील व्यक्तीची असल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपी हे मांस निपाणी येथून गोवा राज्यात घेऊन जात होता. सापडलेले मांस नेमके कोणत्या प्राण्याचे आहे, हे अधिकृत अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.