पुणे येथे ‘महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स’ने वारीनिमित्त ‘अल्लाह देवे अल्लाह दिलावे’ असे फलक लावले !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नावे ‘इस्लामी’ प्रचार करत वारकर्‍यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न !

पुणे येथे वारीनिमित्त लावलेले फलक

पुणे – जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पुण्यनगरीत आगमन होत असतांनाच शहरात ‘महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स’ या संघटनेकडून वादग्रस्त फलक लावले आहेत. स्वारगेट येथील सेव्हन लव्हज चौक येथे लावलेल्या फलकावर संत तुकाराम महाराज यांच्या चित्रासह त्यांच्या अभंगातील ‘अल्लाह देवे अल्लाह दिलावे’ आणि ‘अल्लाह एक तु, नबी एक तु’ अशा ओळी लिहिल्या आहेत. गेल्या वर्षीही अशाच प्रकारचे फलक लावून वारकरी संप्रदायाचे जाणीवपूर्वक इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याची पुनरावृत्ती यंदाही केली आहे.

शहरातील चौकात लावण्यात आलेल्या या फलकावर एका बाजूला जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि दुसर्‍या बाजूला संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांचे मोठे छायाचित्र छापले आहे. खाली संघटनेच्या विविध पदाधिकार्‍यांची छायाचित्रे आहेत. (तुकाराम महाजारांचे हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे अनेक अभंग उपलब्ध आहेत. तुकाराम महाराज आणि वारकरी यांच्याविषयी सलोखा दाखवणार्‍यांनी या अभंगांचाही अभ्यास करावा ! – संपादक)

या फलकावर संतांच्या अभंगांमधील ओळींचा संदर्भ तोडून त्याचा वापर स्वतःच्या धार्मिक अजेंड्यासाठी (कार्यसूचीसाठी) केल्याचे स्पष्टपणे दिसते.

संपादकीय भूमिका

  • तुकाराम महाराजांसारख्या थोर संतांनीही अल्लावर अभंग लिहून त्याचे श्रेष्ठत्व मान्य केले, हे सांगण्याचा इस्लामी प्रचारकांचा हा प्रयत्न आहे. वास्तविक या अभंगातून तुकाराम महाराजांनी प्रयत्नवादावर भर दिला आहे; मात्र स्वतःला आवश्यक तेवढा अभंगाचा भाग घेन इस्लामचे उदात्तीकरण करू पहाणार्‍या अशांपासून हिंदूंनी सावध रहाणे आवश्यक !
  • हिंदु संतांच्या वचनांची एवढीच आवड आहे, तर मग ही संघटना त्यांच्या धार्मिक स्थळांवर संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचे फलक का लावत नाही ?