Baglamukhi Temple Fund Theft : मध्यप्रदेशातील माँ बगलामुखी शक्तिपीठात दानाची चोरी : ३ वर्षे बनावट समिती गोळा करत होती देणगी !

भोपाळ (मध्यप्रदेश) – आगर-मालवा जिल्ह्यातील नलखेडा येथे असलेल्या प्रसिद्ध माँ बगलामुखी मंदिरात दानाच्या रकमेवरून एक मोठा वाद समोर आला आहे. मंदिराच्या नावावर एक अशासकीय, म्हणजेच बनावट खासगी समिती स्थापन करून भाविकांकडून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने दान म्हणून लाटले गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आगर-मालवाच्या जिल्हाधिकारी प्रीती यादव यांनी ७ जुलै या दिवशी ३ सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. ही समिती ७ दिवसांच्या आत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आपला सविस्तर अहवाल सादर करणार आहे.

१. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेल्या तक्रारीनुसार मंदिर परिसरात शासकीय व्यवस्थापन समितीव्यतिरिक्त एक बिगरसरकारी (खासगी) समिती कार्यरत होती. ही समिती मंदिर परिसरातच भाविकांकडून रोख रक्कम, सोने आणि चांदी दान म्हणून गोळा करत होती.

२. दागिने किंवा पैसे अर्पण केलेली रक्कम सरकारी खजिन्यात जमा करण्याऐवजी खासगी बँक खात्यांमध्ये पाठवली जात होती. या संपूर्ण प्रक्रियेच्या वेळी आर्थिक नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आली. तसेच भाविकांची दिशाभूल करण्यासाठी बनावट पावत्याही दिल्या जात होत्या.

३. मंदिराच्या परिसरात सध्या ७ फलक लावले आहेत. त्यावर चांदी दान करणार्‍या १७० लोकांची नावे नोंदवली गेली आहेत; मात्र यानंतर किती लोकांनी मंदिरात दागिने किंवा पैसे अर्पण केले ?, याची कोणतीही नोंद मंदिरात उपलब्ध नाही आणि ती जिल्हा प्रशासनालाही देण्यात आलेली नाही.

संपादकीय भूमिका

बनावट समिती स्थापन करून देवीचा निधी हडप करणार्‍यांना आजन्म कारागृहात डांबणे आवश्यक !