गोव्यात नोंदणीकृत श्री गणेशमूर्ती विक्रेत्यांपैकी २७ टक्के विक्रेते मूर्तीमध्ये १५ ते २० टक्के प्लास्टर ऑफ पॅरिस वापरतात !

बहुसंख्य स्थानिक मूर्तीकार पूर्णपणे नैसर्गिक माती किंवा चिकणमाती यांच्यापासून मूर्ती बनवतात

पणजी, ९ जुलै (वार्ता.) – गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने यंदापासून श्री गणेशमूर्तींचे उत्पादक, विक्रेते, वितरक आणि साठेबाज यांच्यासाठी नोंदणी बंधनकारक केली आहे. अर्ज करतांना मूर्तींचा स्रोत, उत्पादन किंवा विक्रीचा अंदाज आणि त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस आहे कि नाही ? याची माहिती देणे आवश्यक आहे. जूनच्या अखेरपर्यंत गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदणी पोर्टलवर १२९ उत्पादक, विक्रेते, वितरक आणि चित्रशाळा यांनी नोंदणी केलेली आहे. त्यांपैकी ३५ हून अधिक विक्रेत्यांनी (एकूण विक्रेत्यांपैकी अनुमाने २७ टक्के) त्यांच्या मूर्तींमध्ये १५ ते २० टक्के प्लास्टर ऑफ पॅरिस असल्याचे नमूद केले आहे, तर उर्वरित विक्रेत्यांनी शाडू माती, चिकणमाती किंवा नैसर्गिक माती यांपासूनच पूर्ण मूर्ती बनवली जात असल्याचे म्हटले आहे. नोंदणी केलेल्या उत्पादकांपैकी १० उत्पादक किंवा वितरक यांनी ते किती मूर्ती सिद्ध करणार किंवा विकणार ? याची माहिती दिलेली नाही, तर उर्वरितांनी एकूण १ सहस्र १३६ मूर्तींचे उत्पादन किंवा विक्री होणार असल्याचे नमूद केले आहे.

मूर्ती उत्पादकांच्या नोंदणीत डिचोली तालुका अव्वल

मूर्ती उत्पादकांच्या नोंदणीत डिचोली तालुका अव्वल ठरला आहे. तेथील कुंभारवाडा आणि मये परिसरातील पारंपरिक मूर्तीकार मोठ्या प्रमाणावर मातीच्या मूर्ती सिद्ध करतात. त्यानंतर बार्देश आणि फोंडा येथे सर्वाधिक नोंदणीकृत विक्रेते आहेत. याखेरीज सासष्टी, मुरगाव, केपे, सांगे, पेडणे, तिसवाडी, सत्तरी, काणकोण आणि धारबांदोडा येथूनही नोंदणी झाली आहे.

नोंदणीत दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर, पेण, बेळगाव आणि गोव्यातील काही चित्रशाळा यांमधून आणल्या जाणार्‍या मूर्तींमध्ये अनुमती असलेल्या मर्यादेपर्यंत प्लास्टर ऑफ पॅरिस वापरले जात आहे; मात्र बहुसंख्य स्थानिक मूर्तीकारांनी पूर्णपणे नैसर्गिक माती किंवा चिकणमाती यांच्यापासून मूर्ती सिद्ध केली जात असल्याचे घोषित केले आहे.

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने हल्लीच निर्धारित अटींच्या आधारे श्री गणेशमूर्तींमध्ये कमाल २० टक्के प्लास्टर ऑफ पॅरिस वापरण्यास अनुमती दिली आहे. मंडळाकडून नोंदणीकृत चित्रशाळांची पडताळणी, मूर्तींचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत चाचणी आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे प्रमाण पडताळले जाणार आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक प्लास्टर ऑफ पॅरिस आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई, तसेच नोंदणी रहित करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे.