सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकर्‍यांकडून मंत्रालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या करण्याची धमकी

मुंबई, ९ जुलै (वार्ता.) – राज्यशासनाने घोषित केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत ‘क्रांतीकारी शेतकरी संघटने’चे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी मंत्रालयाबाहेर आणि विधानभवनासमोर आंदोलन छेडले. ‘राज्यातील शेतकर्‍याला कोणत्याही अटींविना पूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे’, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. मंत्रालयाबाहेर पोलिसांनी रविकांत तुपकर यांना कह्यात घेताच आंदोलक आक्रमक झाले. काही शेतकरीपुत्र गळ्यात दोरीचा फास अडकवून मंत्रालयासमोरील झाडावर चढले आणि ‘मागण्या मान्य न झाल्यास गळफास घेऊ’, अशी धमकी दिली. यामुळे प्रशासनाची धांदल उडाली.

यापूर्वी आंदोलकांनी सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देत विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत धडक दिली. सरकारचा निषेध करत शेतकर्‍यांच्या ७/१२ उतार्‍यांच्या प्रती हवेत भिरकावल्या, तसेच सोयाबीन आणि कापूस उधळला. पोलिसांनी बळाचा वापर करून तुपकर आणि त्यांचे सहकारी यांना कह्यात घेतले. जून महिन्यात रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे अन्नत्याग आंदोलन केले होते. त्या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अनेक दिवस उलटूनही ठोस कार्यवाही न झाल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.