गोव्यात पारंपरिक मासेमारांसाठी ‘मासे विक्रेते ओळखपत्र’ योजना

पणजी, ९ जुलै – स्थानिक उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी आणि दर्जेदार माशांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय खाते पारंपरिक गोमंतकीय मासेमार आणि मासे विक्रेते यांना ओळखपत्रे देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. ९ जुलै या दिवशी पणजी जिमखाना येथे आयोजित ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मत्स्यव्यवसायमंत्री नीळकंठ हळर्णकर उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘केवळ गोव्याचे रहिवासी असलेले आणि किमान १५ वर्षांपासून राज्यात वास्तव्यास असून पारंपरिक मासेमारी व्यवसायात गुंतलेले लोकच या ओळखपत्रांसाठी पात्र असतील. ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही, त्यांना बाजारपेठांमध्ये किंवा गावागावांत घरोघरी जाऊन मासे विकण्याची अनुमती दिली जाऊ नये. ओळखपत्र असलेल्यांनाच बाजारपेठांमध्ये आणि गावांमध्ये माशांची विक्री करता येईल. याविषयी मासेमारांनी सतर्क रहावे. मासे कापण्याचे कामही शक्यतो स्थानिक लोकांनाच द्यावे. आज चिखलातील खेकडे पालन प्रकल्प (मड क्रॅब कल्चर युनिट्स) उभारण्यासाठीची आर्थिक साहाय्य योजना आणि मासे विक्रेत्यांसाठीची सुधारित आर्थिक साहाय्य योजना चालू करण्यात आली आहे. शीतगृह (कोल्ड स्टोरेज) सुविधा, तापमान नियंत्रित (इन्सुलेटेड) वाहने आणि ट्रॉलर यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी मत्स्यव्यवसाय संस्थांना ५० टक्क्यांहून अधिक अनुदान दिले जाऊ शकते.’’
रस्त्याच्या कडेला मासेविक्री करणार्यांवर कारवाई होणार
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘रस्त्याच्या कडेला होणार्या मासेविक्रीवर कठोर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारे माशांची विक्री करणार्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. रस्त्याच्या कडेला माशांची विक्री करणारे बहुतांश गोव्यातील पारंपरिक मासेमार नसून अशा अनधिकृत विक्रीला आळा घालणे आवश्यक आहे. गोमंतकीय विक्रेत्यांनीही रस्त्यावर माशांची विक्री करणे टाळून अधिकृत बाजारपेठेतून व्यवसाय करावा.’’
कुडाळच्या नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांचे आजपासून उपोषण
‘कॅप्टन ऑफ पोर्ट्स’ची यापुढे ‘गोवा मेरीटाइम बोर्ड’ म्हणून ओळख
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती
पालकांचा कल सरकारी शाळांऐवजी अनुदानित आणि खासगी शाळांकडे
गोव्यात नोंदणीकृत श्री गणेशमूर्ती विक्रेत्यांपैकी २७ टक्के विक्रेते मूर्तीमध्ये १५ ते २० टक्के प्लास्टर ऑफ पॅरिस वापरतात !
गोहत्या करणार्यांची शिक्षा आणि दंड यांत वाढ करा !