पावसामुळे विविध ठिकाणी हानी !

मुंबई – येथील भातसा धरणात २.५० टक्के पाणीसाठा वाढला आहे. वैतरणा नदीला पूर आला होता आणि पालघर जिल्ह्यातील विविध नद्याही दुथडी भरून वहात होत्या. त्यामुळे येथील बहुतांश रस्त्यांवरील वाहतूक बंद होती. पालघर येथे सूर्या नदीला पूर आला आहे. वाडा येथील नैसर्गिक नाले बंद केल्याने काही लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून त्यांची हानी झाली. येथील सफाई-साखरे मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. एका रुग्णाची पाण्यात अडकलेली चारचाकी स्थानिक तरुणांनी बाहेर काढून त्या रुग्णाला रुग्णालयात भरती केले.

भिवंडी परिसरातील पूरस्थिती कायम होती. वज्रेश्वरी, गणेशपुरी येथील काही भागांतील ज्येष्ठ नागरिकांना स्थानिक संस्थांच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. ‘दक्ष नागरिक फाऊंडेशन’ने येथील नागरिकांना साहाय्य केले.

वसई-विरार येथील वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्यामुळे दुकाने आणि घरे यांतील लाखो रुपयांचे सामान, लाकडी सामान आदींनी मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. येथील इंटरनेट आणि भ्रमणभाष सेवा बंद होत्या. येथील रेल्वेरुळांवर पाणी साठल्याने गाड्या अत्यंत अल्प गतीने धावत होत्या.

ठाणे येथील नौपाडा टपाल कार्यालयासमोर आणि कळवा येथे रस्त्यात मोठी झाडे कोसळली.

डहाणू-पनवेल यामधील रेल्वेगाड्या रहित करण्यात आल्या.

नाशिक येथील गोदावरी नदीत २ युवक नदीच्या पूर आलेल्या पाण्यात उड्या मारून पोहत होते, त्यांना पोलिसांनी कह्यात घेऊन दांडुक्याचे फटके दिले. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

६ जुलैपासून मुंबई-पुणे रेल्वे मार्ग दरड कोसळल्याने बंद आहे. आतापर्यंत १७ गाड्या रहित करण्यात आल्या होत्या, तर २१ गाड्यांचे मार्ग पालटण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची पुष्कळ गैरसोय झाली.

लोणावळा येथील हुडको वसाहतीमध्ये ७ ते ८ फूट पाणी गेल्याने पालिकेच्या आपत्कालीन दलाच्या लोकांनी या वसाहतीमध्ये जाऊन नागरिकांना साहाय्य केले.

पुण्याच्या स्वारगेट, गरवारे, वनाज आदी मेट्रो स्थानकांमध्ये छतामधून पाण्याची गळती होत होती.