‘बाईक टॅक्सीं’ना दिवसाला ५ रुपये, तर फेरीमागे २ रुपये कर बसणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

मुंबई, ७ जुलै (वार्ता.) – राज्यात ४ ते साडेचार लाख अनधिकृत बाईक टॅक्सी चालक आहेत. अनधिकृत बाईक टॅक्सींमुळे सरकारचा कर बुडत आहे. यापुढे बाईक टॅक्सींना दिवसाला ५ रुपये, तर प्रत्येक फेरीमागे २ रुपये कर लावण्यात येणार आहे. याविषयीचा प्रस्ताव सिद्ध करण्यात येत आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली. शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी राज्यातील अनधिकृत बाईक टॅक्सींवर कारवाई करण्याविषयीचा तारांकित प्रश्न ७ जुलै या दिवशी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर प्रताप सरनाईक यांनी वरील उत्तर दिले.

मुंबई महानगरपालिका विकास प्राधिकरण क्षेत्रात बाईक टॅक्सी चालू करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाकडून करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये केवळ सरसकट सर्व दुचाकींना अनुमती दिली, तर पेट्रोलवरील अनेक दुचाकी येतील. त्यामुळे केवळ ई-बाईक टॅक्सींना अनुमती देण्याविषयी सांगितले. त्यानुसार तात्पुरत्या कालावधीसाठी राज्यात ई-बाईक टॅक्सींना अनुमती देण्यात आली आहे; मात्र ‘रॅपिडो’, ‘ओला’, ‘उबर’ आदी आस्थापनांच्या अनेक अवैध बाईक टॅक्सी राज्यात कार्यरत आहेत. त्यामुळे ‘बाईक टॅक्सी’वर कारवाई करण्याविषयीचे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.