प.पू. भक्तराज महाराज यांची अमृतमय शिकवण

आज ७ जुलै २०२६ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचा जन्मोत्सव आहे, त्या निमित्ताने...

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. नामसंकीर्तन

‘नाम’ हे बाबांचा जीव कि प्राण आहे. गीतेविषयी बोलतांना बाबा नेहमी म्हणायचे, ‘‘गीतेचे सार म्हणजे, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।’’ (अध्याय १८, श्लोक ६६). तसेच बाबांच्या सर्व शिकवणुकीचे सार म्हणजे नाम असल्याने, हे सूत्र विशेष महत्त्वाचे आहे. बाबा नामाविषयी बोलायचे, ते बहुधा पश्यंती किंवा परा वाणीतील नामाच्या संदर्भात असायचे. याउलट बहुतेक साधकांचा नामजप प्रारंभी वैखरी आणि नंतर मध्यमा वाणीतच चालू असतो; म्हणून साधकाने प्रारंभी नामासह सेवा, त्याग, दुसर्‍यांविषयी प्रेम या गोष्टींना साधनेत महत्त्व देणे आवश्यक असते. त्यानेच तो नामात प्रगती करून परा वाणीपर्यंत येऊ शकतो, म्हणजे नामाशी एकरूप होऊ शकतो.

१ अ. प.पू. बाबांचे ‘भजन आणि नामजप’ यांविषयीचे विचार

१ अ १. भजन आणि नाम हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.

१ अ २. आता भजन करा. नामजप करा. नामजप हे भजन आहे. सारखे करा.

१ आ. भजनांची शिकवण : नामसाधना करा !

(परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले : आपले गुरु म्हणायचे, ‘‘भजनही सब कुछ है ।’’ आपण मात्र भजनात आणि एरव्ही बोलतांना ‘भजन म्हणा’ असे न म्हणता ‘नामजप करा’ असे म्हणता, हे कसे ?

बाबा : आमच्या गुरूंनीही ‘नामजप करा’ हेच सांगितले आहे. त्यांनी ‘भजन करा’ म्हटले, त्या ‘भजन’ मधील ‘भज’ हा शब्द ‘साधना करा’ आणि ‘न’ हे अक्षर ‘नाम’ या अर्थी आहे, म्हणजेच त्यांनीही सांगितले ‘नामसाधना करा’ अन् तेच मी सांगतो

१ इ. श्वास आणि नाम

१ इ १. नाम श्वासाला जोडणे : आपण श्वासामुळे जिवंत असतो, नामामुळे नाही; म्हणून श्वासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच नाम श्वासाला जोडायचे असते. श्वास नामाला जोडायचा नसतो.


प.पू. भक्तराज महाराज यांच्या उद्गारांचा सच्चिदानंद परब्रह्म  डॉ. आठवले यांनी उलगडलेला अर्थ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्री. राम होनप यांचा प्रश्न

‘प.पू. भक्तराज महाराज एकदा म्हणाले होते, ‘संत होणे कठीण असते; कारण संतांच्या पोटात जंत होत असतात.’ याचा अर्थ काय ?’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेले उत्तर

‘प.पू. भक्तराज महाराज यांना ‘संत काही प्रसंगी साधकाचे दुःख आणि त्रास स्वतःवर घेऊन त्याच्या अडचणी दूर करतात. त्याचा संतांना त्रास होत असतो’, असे सांगायचे आहे.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.३.२०२६)

२. वागण्यातून (अप्रत्यक्ष) शिकवणे

२ अ. दुसर्‍यांची सोय पहाणे

२ अ १. रात्री अपरात्री बाबा एखाद्याच्या घरी गेले, तर दारावरची घंटी वाजवल्यावर थोडा वेळ बाहेर गाडीत (मोटारीत) थांबत. घरच्यांना आवराआवर करायला वेळ देत आणि मगच घरात प्रवेश करीत.

२ अ २. बाबा कुणाकडे अवेळी गेले, तर जेवण, भाज्या इत्यादी संगे घेऊन जात.

२ अ ३. बाबा एखाद्याच्या घरी गेले की, तेथे माणसांची वर्दळ चालू होत असे. सकाळ-संध्याकाळ भंडारा असायचा. बाबा तेथे असेपर्यंत त्यांच्या अस्तित्वातील भरपूर शक्तीने सर्व जण उत्साहाने कामे करू शकत. बाबा तेथून गेल्यावर बहुतेकांना एक-दोन दिवस थकल्यासारखे व्हायचे. कुणाला अधिक थकवा येऊ नये, म्हणून बाबा कुणाकडेही दोन-तीन दिवसांहून जास्त दिवस शक्यतो रहात नसत.

२ इ. सर्व उत्कृष्ट करावे

२ इ १. वर्ष १९९२ च्या श्रीरामनवमी उत्सवाला गोव्याचे शिष्य प्रथमच आले होते. आजारामुळे तीन-चार मास (महिने) बाबांनी भजन केले नव्हते आणि त्या रात्री बाबांना भजन म्हणायचे होते. त्यासाठी स्वर (आवाज) लागावा; म्हणून बाबांनी दुपारी भजन म्हणण्याचा सराव केला.

२ इ २. भंडार्‍याच्या वेळी बाबा स्वतः स्वयंपाकातील प्रत्येक पदार्थाची चव घेऊन पहायचे. त्यात काही अधिक-उणे हवे असल्यास तसे सांगायचे. स्वयंपाक मनासारखा झाल्यावरच वाढायला सांगायचे. ‘योगः कर्मसु कौशलम्’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ५०) जे काही करतो, ते कुशलतेने आणि उत्कृष्टपणे करावे, हे गीतेतील तत्त्वज्ञान बाबा जगायचे.

(संदर्भ : सनातनचा ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’ मालिकेतील खंड ३ ‘नामाची महती आणि शिकवण्याच्या विविध पद्धती’)