POK Protest : पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलनाला काश्मीरमधील नागरिकांनी पाठिंबा द्यावा !  

पाकव्याप्त काश्मीरमधील ‘जम्मू-काश्मीर जाँईट आवामी ॲक्शन समिती’ची मागणी

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करताना नागरिक

इस्लामाबाद – पाकव्याप्त काश्मीरमधील सरकारविरोधी आंदोलने दडपण्यासाठी सरकारकडून अमानवीय मार्ग अवलंबला जात आहे. त्यातच ‘जम्मू-काश्मीर जाँईट आवामी ॲक्शन समिती’चे प्रमुख सदस्य सरदार अमन खान यांनी एक व्हिडिओ संदेश प्रसारित करून लोकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनाला भारतीय नागरिकांनी, विशेषतः काश्मिरी नागरिकांनी पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

व्हिडिओमध्ये सरदार अमन खान म्हणाले की,

१. आपल्या मूलभूत अधिकारांची मागणी केल्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना दडपशाही, अन्याय, नरसंहार आणि सैन्याचे आक्रमण यांचा सामना करावा लागला आहे.

२. या अत्यंत कठीण काळात आमचा अन्न आणि औषधांचा पुरवठा रोखण्यात आला आहे.

३. आम्ही सीमेपलीकडील लोकांसह सर्वांना आणि विशेषतः श्रीनगर, पूंछ, मेंढर, राजौरी, जम्मू, काश्मीर खोरे, लडाख आणि कारगिल येथील लोकांना आवाहन करत आहोत. आमच्या आंदोलनाला तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. तुम्ही पुढे आलेच पाहिजे, आमच्या अधिकारांसाठी आवाज उठवला पाहिजे.

यापूर्वीही उठवला होता आवाज

यापूर्वी ३० जून या दिवशी संघटनेने पाकिस्तानी अधिकार्‍यांच्या दडपशाहीच्या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध करून मोठे आंदोलन केले होते. प्रशासनाने केवळ राजकीय हालचालींवर निर्बंध लादले नाहीत, तर संपूर्ण प्रदेशात अन्नधान्याचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत करून लोकांपर्यंत ते पोचण्यावर कठोर निर्बंध लादले आहेत. यामुळे सरकारचा खरा चेहरा उघड झाला, असा आरोप समितीने केला होता.

संयुक्त राष्ट्र कार्यालयाबाहेर आंदोलन

२ जुलै या दिवशी पाकव्याप्त काश्मीरमधील वाढत्या मानवी संकटाच्या आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या निषेधार्थ ‘नॅशनल अँटी-टेररिझम फ्रंट ऑफ इंडिया’ने संयुक्त राष्ट्र कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले. आंदोलकांनी या प्रदेशातील हत्या आणि मानवाधिकाराचे पद्धतशीर उल्लंघन थांबवण्यासाठी तात्काळ जागतिक हस्तक्षेपाची मागणी केली.

संपादकीय भूमिका

पाकव्याप्त काश्मीर भविष्यात भारतात आले, तर तेथील मुसलमान भारताशी एकनिष्ठ रहातील का ? कि हिंदूंच्या विरोधात जिहाद पुकारून भारताचे इस्लामिस्तान करण्याचे षड्यंत्र रचतील ?