कुडचडे येथे ४ ठिकाणी चोरीचा प्रयत्न

पोलीस गस्त पुन्हा चालू करण्याची स्थानिकांची मागणी

प्रतिकात्मक छायाचित्र

कुडचडे, ४ जुलै (वार्ता.) – ३ जुलैच्या रात्री ३ ते पहाटे ५ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कुडचडे परिसरात ३-४ ठिकाणी चाेरी करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांचे सर्व प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये चित्रित झालेले आहेत. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि या ठिकाणी पोलीस गस्त पुन्हा चालू करण्याची मागणी जोर धरत आहे.

चोरीचा प्रयत्न करण्यात आलेली ठिकाणे अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर आहेत, तरी चोरटे कोणत्याही भीतीविना चोरी करत होते. चोरट्यांना कसलाही धाक नव्हता. सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार प्रारंभी चोरट्यांनी श्री सातेरी मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न केला; मात्र मंदिराचे कुलूप फोडता न आल्याने त्यांनी जवळच्या मैदानात झोपलेल्या कामगारांच्या बॅगांमधील साहित्य चोरण्याचा प्रयत्न केला. या वेळी कामगारांना जाग आल्याने चोर तेथून पसार होऊन जवळच्या एका घरात मागच्या बाजूने आत शिरले. या घरातील पितळ्याची भांडी चोरून त्यांनी जवळच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला. असे करत चोरटे बिनधास्तपणे लोकांच्या घरांत  चोरीचा प्रयत्न करत होते. शेवटी हे चोरटे कुडचडे रेल्वेस्थानकापर्यंत गेल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसत आहे. या ठिकाणी गतवर्षी डिसेंबरनंतर पोलीस गस्त बंद आहे आणि ती पुन्हा चालू करणे आवश्यक आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.