
देवापुढे विनम्र होऊन इच्छित गोष्ट तळमळीने मागणे, याला ‘प्रार्थना’ म्हणतात. प्रार्थनेत आदर, प्रेम, विनवणी, श्रद्धा आणि भक्तीभाव या गोष्टी अंतर्भूत आहेत. प्रार्थना करतांना भक्ताची असमर्थता, तसेच शरणागती व्यक्त होत असते अन् तो कर्तेपण ईश्वराला देत असतो. देवाला ओळखण्यासाठी, तसेच त्याच्या अस्तित्वाची देह, मन आणि बुद्धी यांना जाणीव होण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता असते. साधनेत शीघ्र आध्यात्मिक प्रगती साधायची असेल, तर प्रार्थनेत सातत्य ठेवणे, हे आपले प्रमुख साध्य हवे.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
भाव म्हणजे काय ?
भाव म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाची सतत जाणीव असणे. भाव म्हणजे ईश्वराला जाणून घेण्याची जिवात असलेली तीव्र तळमळ ! भाव म्हणजे ईश्वराप्रतीचे अतीव प्रेम, जवळीक आणि शरणागती यांच्या संगमातून अंतःकरणात निर्माण झालेला ओलावा ! (सनातनचा ग्रंथ : ‘भावाचे प्रकार आणि जागृती’)
ईश्वर भावाचा भुकेला !
ईश्वर स्थुलातील कृती पहात नाही, तर त्या कृतीमागचा ‘भाव’ कसा आहे, हे तो पहातो. म्हणूनच शबरीने दिलेली उष्टी बोरे श्रीरामाने प्रेमाने खाल्ली आणि श्रीकृष्णाने सुदाम्याचे पोहे खाल्ले.
– ईश्वर (एका साधिकेच्या माध्यमातून)
भाव (भवसागरातून) ‘तारणारा’ आहे !
भाव तारक आहे. (केवळ ब्रह्म सत्य आहे, शेष (बाकी) सर्व माया किंवा कल्पना आहे.) काल्पनिकाला खरे अस्तित्व नसते. भाव मात्र कल्पना नसून वस्तूस्थिती आहे. वस्तू म्हणजे ब्रह्म. भाव ब्रह्मस्वरूपच आहे.
– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे.
चैतन्याचा भावाप्रमाणे लाभ होणे !
‘देवतेतील चैतन्य हे व्यक्तीतील भावाप्रमाणे असते.’ (देवतेत चैतन्य असतेच. त्या चैतन्याचा व्यक्तीला लाभ होणे, हे व्यक्तीच्या भावावर अवलंबून असते. जितका व्यक्तीचा देवतेप्रती भाव अधिक, तितका तिला देवतेच्या चैतन्याचा लाभ अधिक होतो. – संकलक)
श्रद्धा आणि भाव !
‘बुद्धीच्या पातळीवरील विश्वासाचे रूपांतर पुढे अध्यात्माच्या पातळीवरील श्रद्धेत होते. अशा वेळी श्रद्धेनंतर भावजागृती होते. जेव्हा भावनेकडून साधक भावाकडे जातो, तेव्हा त्यानंतर श्रद्धेची निर्मिती होते.’
‘भाव तेथे देव’ अशी म्हण आहे. ‘श्रद्धा तेथे देव’ अशी नाही. भाव हा श्रद्धा आणि भक्ती यांच्या दरम्यान असतो. श्रद्धा ही प्राथमिक स्वरूपाची म्हणता येईल. ‘जो विभक्त नाही तो भक्त’, ही अद्वैताची अवस्था आहे. श्रद्धेचे भक्तीत रूपांतर करणारा तो भाव होय !
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘भावाचे प्रकार आणि जागृती’)
गुरूंप्रतीच्या व्यष्टी भावाची काही उदाहरणे !
१. प्रत्येक कर्म हे ‘श्रीगुरूंच्या चरणांची सेवा आहे’, असा भाव ठेवून अधिकाधिक मनापासून, अचूक, परिपूर्ण आणि भावपूर्ण करणे
२. प्रत्येक वस्तू ठेवतांना ती ‘श्रीगुरुचरणी ठेवत आहे’, असा भाव ठेवणे
३. पाणी पितांना ‘श्रीगुरुचरणांचे तीर्थ प्राशन करीत आहे’ आणि खाद्यपदार्थ खातांना ‘गुरूंनी दिलेला प्रसाद ग्रहण करीत आहे’, असा भाव ठेवणे
४. गुरूंना शरण जाऊन प्रार्थना करणे, ‘गुरुदेवा, मला काहीही येत नाही, कळत नाही. तूच सर्वकाही सुचव. तुम्हीच सर्वकाही सांगा आणि तुम्हीच सर्वकाही करा.’
५. ‘देवा, माझे मन पूर्णपणे शुद्ध होऊन तुझ्या चरणी अर्पण होऊ दे. ‘मी’ म्हणून जे काही आहे, ते सर्व तुमच्या चरणी अर्पण होऊ दे’, अशी गुरूंना प्रार्थना करणे
(संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ – ‘भावाचे प्रकार आणि जागृती’)
भक्त होण्यासाठी मन निर्मळ होणे आवश्यक !
भगवंत अतिशय शुद्ध आणि पवित्र आहे. या निर्मळ आणि प्रेमळ भगवंताशी एकरूप होण्यासाठी भक्तालाही त्याच्याप्रमाणे निर्मळ आणि प्रेमळ बनले पाहिजे. सत्यकथनामुळे जिवाच्या मनातील दूषितपणा चटकन न्यून होतो आणि त्याचे मन निर्मळ होऊ लागते. अशा निर्मळ हृदयात भक्तीचा उदय होऊन जीव भक्त बनतो आणि परम सत्याची अनुभूती घेण्यास पात्र ठरतो. सत्यकथनाने जिवाच्या मनाचा त्याग होतो आणि त्याच्या मनोदेहाचे अल्प अवधीत शुद्धीकरण होते. – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून)
(संदर्भ : सनातन-निर्मित विविध ग्रंथ ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’)
देवाशी बोलणे ! : देवाला करत असलेल्या कृतीविषयी, करणार असलेल्या कृतीविषयी सांगणे, मनातील विचार सांगणे, अडचणी सांगणे, यांतून एक प्रकारचे अनुसंधानच साधले जाते.
भक्तीमय होण्यासाठी भगवंताच्या नामात रंगून जाणेच हितकारक !
प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘एक तुझे नाम ।’ या भजनपंक्तींद्वारे नामाचे महत्त्व वर्णिले आहे. नामाविना ईश्वराची अनुभूती येत नाही. ईश्वरप्राप्ती करून घेण्याचे वेगवेगळे साधनामार्ग आहेत. दैनंदिन प्रपंचात व्यग्र असणार्या सर्वसामान्य सांसारिकांना आचरण्यास सुलभ असा, शुचिर्भूतता, स्थळकाळ आदी बंधनविरहित असा अन् भगवंताशी सतत अनुसंधान साधून देईल, अर्थात् साधना अखंड चालू राहील असा एकमेव साधनामार्ग म्हणजे नामयोग ! गवत आणि अग्नी एकत्र आले की, गवत जळते अन् जळून अग्नीरूप होते. भगवंताचे नाम घेतले, तर नाम सारी पापे जाळून टाकते आणि भक्त भगवंताशी एकरूप होतो. असे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या भगवंताच्या नामात रंगून जाणेच हितकारक !
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – सुगम भक्तीयोग)




रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना जाणवलेली सूत्रे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘प्रार्थना करणे’ याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे सूक्ष्म ज्ञानातून उमगलेले उत्तररूपी आध्यात्मिक विश्लेषण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा कार्याप्रतीच्या साक्षीभावाचे उदाहरण !
प्रेमळ आणि गांभीर्याने व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्या फोंडा (गोवा) येथील सौ. सुजाता रेणके (वय ६४ वर्षे) !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
प्रार्थना – भक्तीचे साकार रूप !