श्री राजमातंगीदेवी महायज्ञाच्या वेळी सेवा करतांना साधकाला आलेल्या अनुभूती !

श्री राजमातंगीदेवी महायज्ञ

१. यज्ञस्थळी मंडपाच्या बाहेर वडापाव आणि चहा यांचे विक्रीकेंद्र (स्टॉल) लावण्याची संधी मिळणे 

‘प्रभादेवी (मुंबई) येथे १७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. हा महायज्ञ होण्याच्या आधीपासून मी सतत गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) ‘देवा, मला या यज्ञामध्ये सेवा करण्याची संधी मिळू दे’, अशी प्रार्थना करत होतो. मला आमच्या उत्तरदायी साधिकेचा भ्रमणभाष आला. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही यज्ञाच्या ठिकाणी वडापाव आणि चहा यांचे विक्रीकेंद्र (स्टॉल) लावू शकता का ?’, असे विचारले आहे.’’ त्या क्षणी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा ‘गुरुदेव माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करत आहेत’, असे वाटून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले.

२. कुटुंबियांनी वडापाव आणि चहा यांचे विक्रीकेंद्र (स्टॉल) लावण्यासाठी होकार देणे अन् सर्व जण पूर्वसिद्धता करू लागणे 

त्यानंतर मी आमच्या घरातील सर्वांना एकत्र बोलावून त्यांना विचारले, ‘‘प.पू. डॉक्टरांच्या कृपेने आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ती आपण सर्वांच्या साहाय्याने करू शकतो का ?’’ तेव्हा माझा लहान भाऊ श्री. विनोद, त्याची पत्नी सौ. वीणा आणि माझी पत्नी सौ. कस्तुरी यांनी मला होकार दिला अन् सर्व जण पूर्वसिद्धता करू लागले.

३. ‘वडापाव आणि चहा’ यांचे विक्रीकेंद्र (स्टॉल) लावण्याच्या सेवेची पूर्वसिद्धता

श्री. प्रमोद बेंद्रे

अ. मी रात्री आचार्‍याला भ्रमणभाष करून  ‘न्यूनतम ४ ते ५ सहस्र वडे बनवायचे आहेत’, असे सांगितले. दुसर्‍या दिवशी पहाटे ५ वाजता आम्ही (मी आणि विनोद) भाजी मंडईत गेलो आणि तेथून वडे बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणले.

आ. माझा मुलगा श्री. कौस्तुभ आणि भाऊ श्री. विनोद यांनी गोदामातून वडा पाव आणि चहा बनवण्यासाठी लागणारी भांडी घेतली. सौ. कस्तुरी आणि सौ. वीणा यांनी भांडी घासून घेतली. आम्ही सर्वांनी ती भांडी टेम्पोमध्ये भरली. तेव्हा आमच्या मनात ‘आपण सर्वांनी एकमेकांना सहकार्य करून सेवा करूया आणि ही सेवा प्रामाणिकपणे अन् भावपूर्ण करूया’, हा एकच ध्यास होता.

४. यज्ञस्थळी गेल्यावर भव्य मंडप पाहून भावजागृती होणे 

१७.५.२०२६ या दिवशी सकाळी ११ वाजता आम्ही सर्व जण सर्व साहित्य घेऊन यज्ञस्थळी पोचलो. तेथील भव्य मंडप पाहून माझी भावजागृती झाली. तेव्हा माझ्या मनात ‘प.पू. डॉक्टर आपल्यासाठी किती करत आहेत ! आपली किती काळजी घेत आहेत !’, असे विचार येऊन मला त्यांच्या प्रती कृतज्ञता वाटू लागली. यज्ञस्थळी प्रवेश केल्यावर मी ‘प.पू. डॉक्टर, माझ्याकडून ‘वडा-पाव आणि चहा’ बनवण्याची सेवा भावपूर्ण अन् परिपूर्ण होऊ दे. मला सतत कृतज्ञताभावात रहाता येऊ दे’, अशी प्रार्थना करत होतो.

५. सेवेला आरंभ करण्यापूर्वी केलेल्या प्रार्थना आणि संघटितपणे केलेले प्रयत्न

अ. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आम्ही ‘प.पू. डॉक्टर, आम्ही बनवत असलेला वडा-पाव आणि चहा स्टॉलवर येणार्‍या व्यक्तींना मिळू दे’, अशी प्रार्थना केली. त्यानंतर आम्ही ‘यज्ञासाठी महाप्रसाद बनवत आहोत’, या भावाने वडे बनवायला आरंभ केला.

आ. ‘उत्तरदायी साधिकेचे अचूक मार्गदर्शन आणि सहसाधकांनी केलेले सहकार्य’ यांमुळे आम्ही एकजुटीने सेवा केली. आम्ही सर्वांनी एकत्रित बसून ‘कुणी कोणती सेवा करायची ?’, याचे नियोजन केले. माझी पुतणी कु. ईश्वरी विनोद बेंद्रे (वय १७ वर्षे) हिने पैशांचा व्यवहार चांगल्या प्रकारे सांभाळला. माझा मुलगा श्री. कौस्तुभ (वय १८ वर्षे) याने विक्री करणारे आणि वडे बनवणारा आचारी यांच्यामधील समन्वय चांगल्या प्रकारे सांभाळला. त्यामुळे मी निश्चिंत होतो.

६. वडा-पाव आणि चहा बनवण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

अ. वडे तळण्यासाठी ‘गॅस’चे मोठे ‘सिलिंडर’ घ्यायचे होते. ते मला योग्य किमतीत उपलब्ध झाले.

आ. बेकरीतून पाव आणण्यासाठी साधकांनी आम्हाला पुष्कळ साहाय्य केले.

इ. एवढ्या मोठ्या प्रमाणात वडे बनवण्यासाठी मनुष्यबळ पुष्कळ लागणार होते. माझा ‘केटरिंग’चा व्यवसाय असल्याने त्यातील १५ माणसे येणार असल्याचे निश्चित झाले होते. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे सर्व माणसे वेळेत आली. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही.

ई. ही सेवा सहजतेने झाली.

‘गुरुदेव, आपणच आमच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात वडा-पाव बनवण्याची सेवा अल्प वेळेत आणि सहजतेने करून घेतली’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो आणि ‘आमच्याकडून यापुढेही सेवा करून घ्यावी’, अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करतो.’

– श्री. प्रमोद बेंद्रे, सनातन संकुल, देवद

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक