चैतन्य, आनंद आणि कृतज्ञता यांची अनुभूती देणारा सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेला ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

‘१७.५.२०२६ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. महायज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना, तसेच यज्ञाचे थेट प्रक्षेपण पहातांना साधिकेला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री राजमातंगीदेवी

१. यज्ञाच्या संदर्भातील सेवा करण्याची इच्छा पूर्ण होऊन सेवांतून आनंद मिळणे 

‘मुंबईत राजमातंगी यज्ञ होणार आहे’, हे कळल्यापासून ‘आपल्याला यज्ञाच्या सेवांमध्ये सहभागी होता यावे’, असे मला वाटत होते. ‘जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी यज्ञस्थळी प्रत्यक्ष उपस्थित रहावे’, यासाठी साधक, त्यांचे कुटुंबीय, शेजारी इत्यादींना एकत्रित बोलावून त्यांना यज्ञाचे महत्त्व, उद्देश, परिणाम अन् लाभ सांगणे, तसेच जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना यज्ञाचे महत्त्व सांगून ‘ऑनलाईन’ अर्पण घेणे अन् सोशल मिडियाच्या माध्यमातून यज्ञाचा प्रसार करणे’, या सेवाही गुरुकृपेने मला मिळाल्या. या सेवांमधून मला आनंद मिळत होता.

२. यज्ञाचे थेट प्रक्षेपण पहात असतांना आलेल्या अनुभूती ! 

सौ. पूर्वा कुलकर्णी

अ. माझा श्री राजमातंगीदेवीचा नामजप आतून आपोआप आणि अखंड होत होता.

आ. यज्ञ पहात असतांना मला चैतन्य आणि आनंद मिळत होता अन् ‘मला आध्यात्मिक स्तरावरील लाभ होत आहेत’, असे जाणवत होते.

इ. ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी श्री राजमातंगीदेवीच्या मूर्तीभोवती प्रदक्षिणा घातली. तेव्हा ‘त्यांच्या पावलागणिक भारताच्या सीमेभोवती चैतन्याचे दिव्य संरक्षककवच निर्माण होत आहे’, असे मला जाणवले.

ई. श्री राजमातंगी महायज्ञ चालू असतांना बाहेर आकाशात सोनेरी प्रकाश पसरला होता.

उ. ‘महायज्ञस्थळी मी स्वतः प्रत्यक्ष उपस्थित आहे’, असे मला वाटत होते. सोहळ्याविषयी मला पुष्कळ आपलेपणा वाटत होता.

ऊ. यज्ञ पार पडल्यावर मला पुष्कळ आनंद आणि कृतज्ञता वाटत होती.’

– सौ. पूर्वा श्रीराम कुलकर्णी, देवद, पनवेल. (२५.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक