आसक्ती काय घडवते ? याचे महाभारतातील एक उदाहरण

‘द्रोण अन्यायाने लढत आहेत. अधर्माने अस्त्रांचा दुरुपयोग ते करत आहेत. तुझ्या (पांडवांच्या) सैन्याचा सर्वनाश होण्याची वेळ ओढवली आहे, तेव्हा द्रोणाचे बळ नाहीसे करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याला ‘अश्वत्थामा मेला’ म्हणून सांग. सत्यवादित्वाच्या (सत्य सांगणे) उन्मादात ते सांगणे टाळू नकोस.’ युधिष्ठिराने याप्रसंगी श्रीकृष्णाचे ऐकले. निरुपायाने ऐकले आणि सत्यवादित्वाच्या आसक्तीने ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणण्याचे सवडशास्त्र शोधले. त्याचा अधर चालणारा रथ या आत्मवंचनेमुळे पृथ्वीवर टेकला. महाभारताच्या वादिराज नावाच्या टीकाकाराने हे स्पष्ट केले आहे. ‘कृष्णवाक्ये अश्रद्धाकरणं व्याजः’ कृष्णाचे सांगणे जसेच्या तसे न ऐकता युधिष्ठिराने त्याच्या कल्पनेने सत्यरक्षणासाठी दोन्ही डगरींवर हात ठेवण्याचा हा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला दोष लागला. आसक्ती काय घडवते, त्याचे हे उदाहरण लक्षात ठेवण्यासारखे आहे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘जीवन साधना’)