भ्रष्ट व्यवहारांकडे केलेली डोळेझाक हा चंपत राय यांचा गुन्हा ! – VHP

श्रीराममंदिर देणगी चोरीचे प्रकरण

विश्व हिंदु परिषदेचे प्रमुख आलोक कुमार व श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिराच्या संदर्भात जे काही घडले, त्यामुळे वेदना झाल्या आहेत. त्यामुळे जे लोक दोषी आहेत, त्यांना लवकरात लवकर कारागृहात धाडले पाहिजे. यानेच हिंदु समाजाला समाधान वाटेल. श्रीराममंदिर देणगी प्रकरणात श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी निष्काळजीपणा केल्याने ते दोषी आहेत. त्यांनी भ्रष्ट व्यवहारांकडे केलेली डोळेझाक हा त्यांचा गुन्हा असू शकतो, असे वक्तव्य विश्व हिंदु परिषदेचे प्रमुख आलोक कुमार यांनी केले. ते पुढे म्हणाले की, जे काही घडले, ते दुर्दैवी आहे. या घटनेत कुणाचा बचाव करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही.

देणगी चोरीप्रकरणी विहिंप उत्तरदायी नाही ! – आलोक कुमार

श्रीराममंदिराच्या देणगी चोरीच्या प्रकरणास विश्व हिंदु परिषद उत्तरदायी नाही. वर्ष २०१९ मध्ये श्रीरामजन्मभूमीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्याच्या दिवशीच आम्ही स्पष्ट केले होते की, आता विश्व हिंदु परिषदेचे कार्य संपले. मंदिराची निर्मिती करणे आणि त्यानंतर पुढचे दायित्व घेणे हे विहिंपचे काम नाही. त्यामुळे देणगीच्या चोरीस आम्ही उत्तरदायी नाही, असे कुमार म्हणाले.