छत्रपती शिवाजी महाराज हेच देशाचे खरे राष्ट्रपिता ! – श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले

श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले

शिर्डी – छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १४ व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. अवघ्या ३६ वर्षांमध्ये त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते कधीही कुणालाही घाबरले नाहीत. प्रत्येक लढाईमध्ये ते स्वतः पुढे असायचे ! छत्रपती शिवराय नसते, तर आपण नसतो ! भारतातील चलनांवरही छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र हवे होते. छत्रपती शिवाजी महाराज हेच देशाचे खरे राष्ट्रपिता आहेत, असे उद्गार छत्रपती राजघराण्याच्या राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी काढले. त्या शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आल्या होत्या. तेव्हा त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला.

श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले म्हणाल्या

१. छत्रपती शिवाजी महाराज आज असते, तर महिलांवर अत्याचार करणार्‍यांना तोफेच्या तोंडी दिले असते. आज महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी कुणीच काही करतांना दिसत नाही. छत्रपती शिवराय आदर्श राज्यकर्ते, तर होतेच; परंतु कुशल प्रशासकही होते. आजचे राज्यकर्ते केवळ छत्रपतींचे नाव घेतात. तो त्यांचा दांभिकपणा आहे.

२. छत्रपतींच्या अनेक गडांचा ‘युनोस्को’च्या सूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून गडांच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; मात्र खरेच हा पैसा सत्करणी लागतो का ? गड-कोटांच्या संवर्धनामध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांचा कडेलोट करावा, असे वाटते. त्यामुळे चांगले लोक ‘गड संवर्धन समिती’मध्ये असावेत. जागृत शिवभक्तांनी गड संवर्धनाचे काम प्रत्येक आठवड्याला पाहिले पाहिजे. गड संवर्धनात चुकीच्या गोष्टी घडत असतील, तर ते सरकारच्या निदर्शनास आणून द्यायला हवे.

संपादकीय भूमिका

भारतीय चलनावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र प्रसिद्ध करण्यासाठी शासनकर्ते केव्हा प्रयत्न करणार !