भारतीय संस्कृती सहस्रो वर्षे प्राचीन ! – डॉ. नीलेश ओक, प्रख्यात संशोधक

पुणे येथे आयोजित ‘डायनामिक भारत २०४७’ व्याख्यान !

पुणे – भारतीय संस्कृती २० ते २५ सहस्र वर्षांहून अधिक प्राचीन आहे. दुर्दैवाने आजही आपल्या शिक्षणसंस्थांमध्ये याविषयी चुकीचे शिक्षण दिले जात आहे. भारताचा गौरवशाली इतिहास आणि विज्ञान यांची सांगड घालून आपल्याला २०४७ पर्यंत ‘डायनामिक (परिवर्तनशील) भारत’ घडवायचा आहे, असे वक्तव्य प्रख्यात संशोधक आणि लेखक डॉ. नीलेश ओक यांनी केले. ‘नागरिक सोशल फाऊंडेशन’ आणि ‘अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डायनामिक भारत २०४७’ या व्याख्यानात ते बोलत होते. व्याख्यानाला विद्यार्थी, पालक आणि इतिहासप्रेमी नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘आगामी व्याख्यान हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे आहे’, असे या वेळी घोषित करण्यात आले. कार्यक्रमाचा प्रारंभ संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमेय सप्रे यांनी केले, तर आभारप्रदर्शन सई धडफळे यांनी केले.

डॉ. नीलेश ओक म्हणाले,

१. खगोलशास्त्रीय पुराव्यांच्या आधारे महाभारत युद्ध इसवी सन पूर्व ५५६१ मध्ये आणि रामायण इसवी सन पूर्व १२२०९ मध्ये घडल्याचे समजते. पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीत शिकवला जाणारा ‘आर्य आक्रमणाचा सिद्धांत’ निराधार असून भारतीय संस्कृती याच भूमीतून जगभर पसरली आहे, याचे जेनेटिक्स (जनुके आणि अनुवंशिक गुणधर्म) आणि भूगर्भीय पुरावे उपलब्ध आहेत.

२. अंगस मेडिसन यांच्या आकडेवारीनुसार, गेल्या २ सहस्र वर्षांपैकी बराच काळ जागतिक ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्नात) भारताचा वाटा ४० टक्क्यांहून अधिक होता. भारत केवळ आध्यात्मिक देश नसून तो आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्याही प्रगत होता.

३. जगातील शेतीचे सर्वांत प्राचीन पुरावे भारतीय उपखंडात (श्रीलंका आणि भारत) साधारण ४५ सहस्र वर्षांपूर्वीचे मिळतात. आधुनिक विज्ञानाची पद्धत महर्षी गौतमांच्या ‘न्यायदर्शना’त सहस्रो वर्षांपूर्वीच मांडली गेली आहे. तिचा उपयोग आजही प्रगत संशोधनात केला जाऊ शकतो.

४. विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी युवकांनी केवळ ‘कॉपी-पेस्ट’ तंत्रज्ञानावर अवलंबून न रहाता स्वतःची कल्पकता जोपासली पाहिजे. त्यासाठी भगवद्गीता आणि भारतीय दर्शनशास्त्रे याचा अभ्यास करणे अनिवार्य आहे.

५. ऋग्वेदात उल्लेखलेली सरस्वती नदी ही गंगेपेक्षाही मोठी होती. आधुनिक भूगर्भीय संशोधनानुसार, १ लाख ७२ सहस्र वर्षांपूर्वीपासून ते ८० सहस्र वर्षांपूर्वीपर्यंत ही नदी प्रचंड वेगाने वहात होती, असे पुरावे मिळतात.