बनावट औषधे आणि इंजेक्शने विकणार्‍यांवर कारवाई होत नसल्याने सदस्य संतप्त !

महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन

मुंबई, ३० जून (वार्ता.) – राज्यात बनावट इंजेक्शन आणि औषधे यांच्या विक्रीशी संबंधित यंत्रणा कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणांतील गुन्हेगारांवर कठोर कारवाईविषयी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री श्री. नरहरी झिरवळ यांनी विधान परिषदेत दिलेल्या असमाधानकारक आणि आवेशपूर्ण उत्तरामुळे विरोधी सदस्य आक्रमक झाले. त्यांनी मंत्री झिरवळ यांना धारेवर धरले. मंत्र्यांच्या उत्तरांनी सदस्य समाधानी न झाल्याने सभागृहाचे अध्यक्ष श्री. प्रमोद जठार यांनी हा प्रश्न राखून ठेवला. विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत भारतीय, परिणय फुके, विक्रांत पाटील, सौ. चित्रा वाघ, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि प्रवीण दरेकर यांनी हा तारांकित प्रश्न विचारला होता.

सदस्य श्रीकांत भारतीय आणि परिणय फुके म्हणाले की, अत्यंत सौम्य शिक्षा लादून देशद्रोही आणि मानवी हत्या करणार्‍या गुन्हेगारांना मोकळे सोडले जात आहे का ? राज्यात बनावट इंजेक्शन बनवणार्‍या किंवा अमली पदार्थ विकणार्‍यांवर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३०४ नुसार आणि मकोका अंतर्गत गुन्हे नोंद केले पाहिजेत.

यावर मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले की, राज्यात बनावट इंजेक्शन आणि औषध विक्री रॅकेटवर या प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला आहे. दुधाची चैन, गुटख्याची चैन सामूहिक गुन्हेगारी मोडत असल्याने अशा प्रकरणांतील गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई कायदा करण्याविषयी विधी न्याय आणि गृह विभागाकडून माहिती घेऊन कार्यवाही करू. अशा गुन्ह्यांतील आरोपींवरील  जी कलमे आहेत, ती पुन्हा पडताळून त्याच्यात वाढ केली जाईल. केंद्रशासनाकडून कायदे केले जात असल्याने केंद्रशासनाला कायदा बनवण्याविषयी कळवले जाईल.

या वेळी सदस्यांनी पुन्हा आक्रमक होऊन नेमकी कोणती कठोर करणार आहे ? असा प्रश्न विचारल्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम ३१८, ३३६, ३४० कलमांनुसार आरोपींवर कारवाई करू, असे मोघम सांगितले; मात्र या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही. आमदार अनिल परब म्हणाले की, मंत्री नरहरी झिरवळ यांना उत्तर देता येत नसेल, तर राज्यमंत्र्यांना बोलवा.