‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ९.५.२०२६ या दिवशी तिथीनुसार वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त कोल्हापूर येथे १०.५.२०२६ या दिवशी भव्य अशा ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या संदर्भात सेवा करतांना साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. सौ. माधुरी कुलकर्णी, कोल्हापूर
अ. ‘हिंदु एकता दिंडी’निमित्त मोठ्या कार्यक्रमाच्या नियोजनाचे दायित्व मी प्रथमच घेतले होते. ‘हिंदु एकता दिंडी’चे नियोजन करण्यासाठी अल्प कालावधी होता. ‘गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) मला ही सेवा दिली आहे’, असा मी भाव ठेवला. मी गुरुदेवांना ‘तुम्हीच माझ्याकडून सेवा करून घ्या’, अशी सतत प्रार्थना करत होते.
आ. मला या सेवेत अनेक अडचणी आल्या. या सेवेच्या अंतर्गत वेगवेगळे प्रसंगही घडत होते; परंतु प्रसंग हाताळतांना माझ्या मनात कुणाविषयीही प्रतिक्रिया आली नाही. मी प्रत्येक वेळी ‘स्थिर रहाणे, संयम ठेवणे आणि सकारात्मक राहणे’, असे प्रयत्न केले. मी सकारात्मक राहिल्यामुळे सेवेत पालट झाले, तरीही मला सेवा भावाच्या स्तरावर पूर्ण करता आली.
इ. मी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि श्री गुरु यांना सूक्ष्मातून समवेत घेऊन सेवा करत होते.
ई. या कालावधीत प्रतिदिन ३ – ४ घंटे सत्संग घेणे, भ्रमणभाषवर संपर्क करणे, घरची कामे करणे इत्यादी करूनही माझ्याकडून व्यष्टी साधना पूर्ण होत होती. त्यातून मला आनंद मिळत होता.
उ. ‘चूक स्वीकारणे आणि पुढे जाणे’ अशा प्रकारे मला ही सेवा करता आली. गुरुदेवांनी मला अखंड भावस्थितीत ठेवून माझ्याकडून सेवा करून घेतली. ‘गुरुदेवांनीच मला या वेळी शिकण्याची संधी दिली’, त्याबद्दल मी श्री गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
२. सौ. पूजा सातपुते, कोल्हापूर
२ अ. ‘कोल्हापूर येथे ‘हिंदु एकता दिंडी’ आहे’, हे ऐकूनच मला पुष्कळ आनंद झाला.
२ आ. हिंदु एकता दिंडी’ला समाजातील व्यक्तींचा लाभलेला प्रतिसाद !
१. दिंडीनिमित्त समाजातील व्यक्तींना भेटतांना आम्ही सूक्ष्मातून गुरुदेव आणि सद्गुरु स्वाती खाडये यांना समवेत घेऊन जात होतो. आम्हाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला.
२. प्रत्येक ठिकाणी संपर्काला गेल्यावर समाजातील हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी आम्हाला लगेच भेटत होते. आम्हाला त्यांच्याकडूनही चांगला प्रतिसाद मिळत होता. सर्व जण म्हणायचे, ‘‘आम्ही स्वागताची सर्व सिद्धता करतो. तुम्ही काही काळजी करू नका.’’
३. सर्वांनी दिंडीच्या स्वागतासाठी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. त्यामध्ये लिहिले होते, ‘हिंदु एकता दिंडीचे सहर्ष स्वागत !’ हे पाहून आमचा कृतज्ञताभाव जागृत झाला. ‘समाजातील व्यक्ती दिंडीच्या स्वागताची सिद्धता करून हार, रांगोळी, फुले, पाट आणि आरतीचे ताट घेऊन गुरुदेवांची वाट पहात उभ्या राहिल्या आहेत’, असे मला वाटले. ‘साक्षात् महालक्ष्मी आम्हाला भेटायला येणार आहे’, असा त्यांचा भाव होता. हे सर्व पाहून माझे मन कृतज्ञतेने भरून येत होते. माझ्या शरिरावर रोमांच येत होते.
२ इ. या दिंडीनिमित्त माझ्याकडे दिंडीचे स्वागत करणे, रांगोळी काढणे, पुष्पवृष्टी करणे, या संबंधित सेवा होत्या. या वर्षी माझ्याकडून दिंडीनिमित्तची सेवा सहजतेने झाली. मला कोणताही ताण आला नाही.’

३. सौ. सुजाता वर्णेकर, गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर)
३ अ. साधक आणि समाजातील व्यक्ती यांचा समन्वय करण्याची सेवा सहजतेने होणे : ‘माझ्याकडे पालख्यांची सजावट करणार्या आणि पालखी धरणार्या साधकांचा समन्वय करणे, तसेच दिंडीत सहभागी असलेल्या काही पथकांतील साधक आणि समाजातील व्यक्ती यांचा समन्वय करणे, या सेवा होत्या. ‘या सर्व सेवा मी केल्या’, असे मला कधीच वाटले नाही.
३ आ. मला या सेवा करतांना कोणतीही अडचण आली नाही. ‘गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करणे, ऐकणे, स्वीकारणे आणि कृती करणे’ यांमुळे सेवेत अडचण आली नाही. मला सेवा भावपूर्ण करता आली.
३ इ. पालख्यांची सजावट करण्याची सेवा भावपूर्ण होणे
१. आम्हाला ३ ठिकाणांहून ३० किलो झेंडूची फुले मिळाली. त्यानंतर हार करण्यासाठीही फुले मिळाली.
२. पालख्यांची सजावट करण्यापूर्वी मी श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांना प्रार्थना केली, ‘हे श्रीकृष्णा, प.पू. गुरुदेवा, आमची काही पात्रता नसतांना तुम्ही आम्हाला ही सेवा दिली आहे. पालख्यांची सजावट करण्याच्या ठिकाणी आम्हाला तुमचे अस्तित्व जाणवू दे. तुम्हीच आमच्याकडून ही सेवा अल्प वेळेत भावपूर्ण करून घ्या. ही प्रार्थना तुमच्या चरणी पोचल्याची अनुभूती आम्हाला द्या.’ आम्ही सकाळी ७ वाजता ही सेवा चालू केली. आम्हाला सेवा करतांना वेगळाच आनंद जाणवत होता. आमच्याकडून ही सेवा अल्प वेळेत पूर्ण झाली. ‘सेवा भावपूर्ण झाली’, असे सद्गुरु स्वाती खाडये यांनी मला सांगितले.
३. साधकांनी गुलाबाच्या पाकळ्यांचा हार केला होता. हा हार करण्यासाठी पुष्कळ वेळ लागत होता. सर्व जण मन लावून एकाग्रतेने सेवा करत होते आणि प्रथमच ही सेवा करत होते. ‘हा हार कुणाच्या चित्राला घालायचा ?’, हे ठरले नव्हते. पालखी सिद्ध झाल्यावर तो हार गुरुदेवांच्या छायाचित्राला घातला गेला. तो हार फार सुंदर दिसत होता.
३ ई. प्रत्येक वर्षी पालखी धरणार्या साधकांना काहीतरी अडचणी येत असत. साधकांना ती सेवा करतांना थोडा ताण असायचा; मात्र या वेळी सर्व साधक ठरलेल्या वेळेत उपस्थित होते. ती सेवा करतांना सर्व साधकांना वेगळीच अनुभूती आली.
३ उ. दिंडीत ७० पथके सहभागी होणे : ‘दिंडीत सहभागी होण्यासाठी समाजातील व्यक्तींना संपर्क केल्याचा आढावा एकत्र करतांना तो गुरुदेवच माझ्याकडून करून घेत आहेत’, असे मला जाणवले. मी गुरुदेव सूक्ष्मातून सुचवतील तसे करत होते. या वेळी दिंडीत ‘लेझीम पथक, गदा पथक, शाहिरी पथक, बासरी पथक, ढोलपथक, प्रथमोपचार पथक, लाठीकाठीची प्रात्यक्षिके दाखवणारे ‘रणरागिणी’ पथक, टाळ-मृदंग घेतलेले वारकरी पथक, अशी एकूण ७० पथके होती. याचे मला आश्चर्य वाटले. साधकांनी गुरुकृपा अनुभवली.
३ ऊ. त्या कालावधीत माझी प्रकृती ठीक नव्हती; मात्र मला त्याचा थोडाही त्रास झाला नाही. मी त्या त्रासांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मला सेवा आनंदाने करता आली.’
४. सौ. संगीता पाटील, कोल्हापूर
अ. ‘गुरुमाऊलींच्या कृपेने मला ‘हस्तफलक तयार करणे, नवीन फलक लाकडी चौकटीत (फ्रेममध्ये) बसवणे, झेंडे बनवणे, सर्वांना साहित्य देणे’ या सेवा मिळाल्या होत्या. अल्प कालावधी आणि अल्प साधकसंख्या असतांनाही माझ्याकडून ही सेवा भावपूर्ण अन् परिपूर्ण झाली.
आ. सर्वच साधकांना ही सेवा संघभाव ठेवून आणि अपेक्षाविरहित करता आली. सर्वच साधकांना सेवा करतांना आनंदाची अनुभूती घेता आली. ‘गुरुमाऊलीच सर्व साधकांना सेवा करण्यासाठी अखंड ऊर्जा पुरवत आहे’, असे मला जाणवले.
इ. दिंडीच्या दिवशी समष्टीसाठी ‘महाशून्य’ हा नामजप एक घंटा एका जागी बसून पूर्ण करता आला. सर्व सेवा समयमर्यादेत झाल्यामुळे मला व्यष्टी साधनेचे प्रयत्नही पूर्ण करता आले.’
५. आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५७ वर्षे), कोल्हापूर
अ. ‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) जन्मोत्सवानिमित्त ‘देव आम्हाला भरभरून देत आहे’, असे मला जाणवले. ‘आम्हाला एखादी वस्तू हवी आहे आणि ती मिळाली नाही’, असे झाले नाही.
आ. या वेळी नवीन जिज्ञासू आणि हितचिंतक यांनी भावपूर्ण सेवा झाली. ‘हे सर्व देवाचे नियोजन आहे आणि सेवा सहजतेने होत आहे’, असे मला अनुभवायला आले.
इ. दिंडीसाठी एकूण ३ पालख्यांची सजावट करायची होती. या वेळी २ नवीन जिज्ञासूंनी पालखीच्या सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात फुले अर्पण दिली. त्यामुळे साधकांना पालखीची सजावट अतिशय सुंदर पद्धतीने करता आली.
ई. कोल्हापूर येथे ‘हिंदु एकता दिंडी’ गुरुदेवांच्या कृपेने निर्विघ्नपणे आणि भावपूर्ण वातावरणात पार पडली.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २०.५.२०२६)
धर्मांधांनी केलेली राष्ट्रहानी आणि त्याकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष !
‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने वाचकांना झालेले लाभ
हे ब्राह्मणद्वेष्ट्यांचे पाप आहे !
साधक नामजप करत असतांना त्याला भगवान शिवाच्या अस्तित्वाची आलेली अनुभूती
मुलांवर साधनेचे संस्कार करणारे आणि शेवटपर्यंत देवाच्या अनुसंधानात असणारे बेळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. रामू गणपति मिसाळ (वय ६६ वर्षे) !