‘१२.६.२०२६ या दिवशी डॉ. भूपाल भाऊ शेंडे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांचा ८८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. सौ. संगीता पाटील (डॉ. भूपाल भाऊ शेंडे यांची मोठी मुलगी), कोल्हापूर
१ अ. समाधानी आणि आनंदी : ‘बाबा प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठतात. त्यांचे वय ८८ वर्षे आहे, तरीही ते कधीही ‘काही दुखत आहे किंवा काही त्रास होत आहे’, असे सांगत नाहीत. आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडून ‘देवाने ज्या स्थितीत ठेवले आहे, त्यात माणसाने समाधानी रहावे’, असे ऐकत आलो आहोत. त्याप्रमाणे त्यांचे आचरणही आहे.
१ आ. दैनिक ‘सनातन प्रभात’ आवडीने वाचणे : बाबा दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमितपणे आणि आवडीने वाचतात. त्यांना त्यातील संपादकीय लेख फार आवडतात. त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’मधील एखादा लेख आवडल्यास ते आम्हाला भ्रमणभाष करून तो लेख वाचायला सांगतात. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून तो लेख आवडला असल्याचा आनंद व्यक्त होतो.
१ इ. सत्संगाप्रती भाव – सत्संग झोपून न ऐकता आसंदीत बसून ऐकणे : काही दिवसांपूर्वी आम्ही गोवा येथे गेलो होतो. तेथे त्यांचा नातू श्री. अक्षय पाटील याच्या घरी गेल्यानंतर ‘बाबांना रामनाथी आश्रमात नेता येईल’, असा आमचा विचार होता. आम्ही गोवा येथे पोचल्यावर त्याच दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्या साधकांसाठी एक सत्संग होता. आम्ही बाबांना भ्रमणभाषवर सत्संग ऐकायला दिला. तेव्हा ते पुष्कळ वेळ आसंदीत बसून तो सत्संग ऐकत होते. ‘ते प्रवास करून आल्यामुळे दमले असतील’, असे वाटून आम्ही त्यांना ‘पलंगावर आडवे होऊन सत्संग ऐकता का ?’, असे विचारले; मात्र बाबांनी आसंदीत बसूनच सत्संग ऐकला. ते घरीही नेहमी आसंदीत बसूनच भक्तीसत्संग ऐकतात.
१ ई. चुकीविषयी संवेदनशील : एकदा मी त्यांना ‘वर्तमानपत्र वाचायला घेऊ का ?’, असे विचारले. तेव्हा त्यांचे वर्तमानपत्र वाचून व्हायचे होते; म्हणून ते मला ‘नंतर देतो’, असे म्हणाले. नंतर त्यांना ‘या प्रसंगात आपण चुकीचे वागलो’, असे वाटून रात्रभर झोप लागली नाही. याविषयी त्यांना मनातून पुष्कळ खंत वाटली.’
२. सौ. अनिता करमळकर (डॉ. भूपाल भाऊ शेंडे यांची धाकटी मुलगी), कोल्हापूर
२ अ. जेवणा-खाण्याचे पथ्य तंतोतंत पाळणे : ‘बाबा नाेकरीनिमित्त बाहेरगावी रहात होते. त्या वेळी ते केळी आवडीने खात असत. आम्ही त्यांना ‘कफ होईल; म्हणून केळी खाऊ नका’, असे सांगितले. तेव्हा त्यांनी केळी खाणे पूर्णपणे बंद केले. ‘त्यांची रक्तातील साखर थोडी वाढली आहे’, असे समजल्यावर त्यांनी साखरेचे पदार्थ आणि डाळींब खाणे पूर्णपणे बंद केले. त्यांना कोणतेही पथ्य सांगितल्यावर ते लगेच त्याचे पालन करतात.
२ आ. इतरांचा विचार करणे
१. त्यांचा मोठा मुलगा (डॉ. शशिकांत शेंडे) हे दिवसभर रुग्णालयात कार्यरत असतात. त्यामुळे त्यांना वर्तमानपत्र वाचायला वेळ मिळत नाही; म्हणून ते प्रतिदिन पहाटे ५.३० वाजता वर्तमानपत्र घेऊन येतात आणि मुलाला वाचायला देतात. मुलाचे वर्तमानपत्र वाचून झाल्यावर बाबा स्वतः वर्तमानपत्र वाचतात.
२. बाबा दूरचित्रवाणीवर वाहिन्यांवरील कार्यक्रम पहात असतांना घरी कुणीही आले, तर ते लगेच दूरदर्शन संच बंद करून घरी आलेल्या व्यक्तीला वेळ देतात. बाबा त्या व्यक्तीशी मोकळेपणाने आणि आनंदाने बोलतात.
२ इ. इतरांना आनंद देणे : घरी सर्व नातवंडे एकत्रित जमली किंवा कुणाचा वाढदिवस असेल, तर सर्वांना आनंद मिळावा आणि एकत्र रहाता यावे, यासाठी बाबा सर्वांना जेवायला बाहेर घेऊन जातात. त्यांना इतरांना आनंद देण्यातच आनंद मिळतो.’
३. सौ. अनिता करमळकर आणि सौ. संगीता पाटील (डॉ. भूपाल भाऊ शेंडे यांची मोठी आणि धाकटी मुलगी), कोल्हापूर
३ अ. ‘बाबा या वयातही पहाटे उठून नियमितपणे योगाभ्यास करतात.
३ आ. ओळखीच्या लोकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी करणे : आम्ही बाबांच्या समवेत पहाटे फिरायला गेल्यावर बाबांचे मित्र बाबांच्या प्रकृतीविषयी विचारतात. तेव्हा बाबा आनंदाने त्यांना ‘माझी प्रकृती उत्तम आहे’, असे सांगतात. आम्ही फिरायला गेल्यानंतर बाबा काही वेळा ओळखीच्या लोकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस करतात. एकदा ते एका व्यक्तीची आस्थेने विचारपूस करत होते. त्या वेळी त्या व्यक्तीचे डोळे भरून आले.
३ इ. बाबा प्रत्येक प्रसंग आनंदाने स्वीकारतात.
३ ई. साधकांचे भरभरून कौतुक करणे : बाबांना साधकांबद्दल पुष्कळ आदर आहे. ते काही साधकांची नेहमी विचारपूस करतात. त्यांना साधकांचा साधेपणा आणि सेवा करण्याची वृत्ती पाहून पुष्कळ आनंद होतो. ते साधकांचे भरभरून कौतुक करतात.
३ उ. स्वीकारण्याची वृत्ती
१. वर्ष २०१७ मध्ये अकस्मात् आमच्या आईचे निधन झाले. तेव्हा बाबांनी स्थिर राहून सहजतेने प्रसंग स्वीकारला.
२. वर्ष २०२१ मध्ये एकदा घरातील सर्व जण गाडीतून जात असतांना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. तेव्हा बाबांच्या हाताचा अस्थीभंग होऊन त्यांच्या हाताचे मोठे शस्त्रकर्म झाले. बाबांनी हा प्रसंगही सहजतेने स्वीकारला आणि त्यातून ते लवकर बरे झाले.
३ ऊ. बाबांच्या सहवासात आमचे मन उत्साही आणि आनंदी होते. त्यांच्या प्रत्येक कृतीतून आम्हाला साधकत्व अनुभवता येते.
३ ए. सतत अनुसंधानात असणे : बाबांची गुरुदेवांवर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर) पुष्कळ श्रद्धा आहे. ‘ते सतत अनुसंधानात आहेत’, असे आम्हाला जाणवते.
३ ऐ. अंतर्मनाची साधना चालू असणे : वर्ष २०१८ मध्ये बाबांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रत्येक वर्षी आध्यात्मिक प्रगती होत आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीतून ‘त्यांची अंतर्मनाची साधना चालू आहे’, असे जाणवते.
‘गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला असे वडील लाभले’, त्याबद्दल आम्ही गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. ‘त्यांना लवकरच संतपद प्राप्त होवो’, अशी गुरुदेवांच्या चरणी आर्ततेने प्रार्थना करतो.’
४. डॉ. अरुण शंकर करमळकर (डॉ. भूपाल शेंडे यांचे लहान जावई ), श्री. अनमोल करमळकर आणि सौ. अवनी करमळकर (डॉ. भूपाल शेंडे यांचा नातू आणि नातसून), कोल्हापूर
अ. ‘आम्हाला बाबांचा सहवास हवाहवासा वाटतो. त्यांच्या सहवासात असतांना आमचे मन शांत, स्थिर आणि निर्विचार होते.’
५. श्री. अजय ज्ञानदेव पाटील (डॉ. भूपाल भाऊ शेंडे यांचे मोठे जावई), कोल्हापूर
अ. ‘बाबांच्या घरी एक कुत्रा आहे. बाबा त्याला वेळेत जेवायला देतात. बाबा बाहेर गेले, तरीही ‘कुत्र्याला वेळेत खायला दिले ना’, याकडे त्यांचे लक्ष असते. त्या कुत्र्याचेही बाबांवर पुष्कळ प्रेम आहे.’
६. श्री. विवेक शशिकांत शेंडे (डॉ. भूपाल शेंडे यांचा नातू , मुलाचा मुलगा), कोल्हापूर
अ. ‘आजोबा मला नवीन गोष्ट शिकण्यासाठी प्रोत्साहन देतात.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ६.६.२०२६)
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
सद्गुरु (कै.) श्रीमती निर्मला दातेआजी यांची सेवा करत असतांना दाते कुटुंबियांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सतत आनंदी असलेल्या आणि नृत्यकलेप्रती समर्पणभाव असलेल्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !