केरळम्‌ : मदरसा शिक्षकाशी लग्न ठरल्याने अप्रसन्न झालेल्या १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या

आत्महत्या केलेली तरुणी मुबशिरा (डावीकडे)

कासारगोड (केरळम्‌) – मदरसा शिक्षकाशी लग्न ठरल्यामुळे अप्रसन्न झालेल्या केरळम्‌मधील कासारगोड जिल्ह्यातील चेरुवथूर येथे एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने उंदराचे विष प्राशन करून आत्महत्या केली. मुबशिरा असे तिचे नाव असून ती कैथक्कड-पय्यांकी बिस्मिल्ला रोड येथील रहिवासी यू. अब्दुल रहमान आणि यू. एम्. फातिमा यांची कन्या होती.

मुबशिरा ही अलवरदा महिला महाविद्यालयात शिकत होती. अलीकडेच तिच्या पालकांनी तिचे लग्न एका मदरसा शिक्षकाशी ठरवले होते आणि तिचा साखरपुडाही झाला होता. चंदेरा पोलिसांच्या माहितीनुसार विष प्राशन केल्यानंतर मुबशिराला २ जूनला मंगळुरू (कर्नाटक) येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. काही दिवस अतीदक्षता विभागात उपचार घेतले; परंतु १० जूनला सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.