गुडघेदुखी ही सध्या एक मोठी समस्या बनली आहे. यावर पाश्चात्त्य वैद्यकशास्त्रात इंजेक्शन आणि शस्त्रक्रिया असे पर्याय आहेत; पण ‘जळू’ लावून केले जाणारे आयुर्वेदाचे उपचार हा अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सुयोग्य आहे. अनेकांना प्रश्न पडतो की, एक छोटासा जीव गुडघ्यातील वेदना कशा कमी करू शकतो ? याचे उत्तर जळूच्या अंगात असलेल्या ‘जैव-वैज्ञानिक’ किमयेमध्ये आहे. जळू कशा प्रकारे काम करते, ते जाणून घ्या.

१. रक्तातील गुठळ्या आणि अडथळे दूर करणे
सांधेदुखीमध्ये गुडघ्याभोवतीच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त साठून रहाते किंवा त्याचा प्रवाह मंदावतो. जळू जेव्हा गुडघ्याला लावली जाते, तेव्हा ती आपल्या लाळेतून ‘हिरूडिन’ नावाचे घटक सोडते. हे जगातील सर्वांत शक्तीशाली नैसर्गिक ‘अँटी-कोॲग्युलंट’ (रक्त पातळ करणारे द्रव्य) आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि सांध्यातील जडपणा न्यून होतो.
२. ‘हायलुरोनिक ॲसिड’ आणि जळू
गुडघ्याच्या सांध्यामध्ये वंगण म्हणून ‘हायलुरोनिक ॲसिड’ असते. पाश्चात्त्य वैद्यकात गुडघ्यातील वंगण न्यून झाल्यावर याची इंजेक्शन दिली जातात. लक्षात घेण्याचे सूत्र, म्हणजे इंजेक्शनमधील ५० टक्के घटक पुढील २४ घंट्यात शरिरातून बाहेर टाकले जातात.
दुसरीकडे जळूच्या लाळेत ‘हायलुरोनिडेज’ नावाचे ‘एन्झाईम’ (जैव उत्प्रेरक) असते. हे ‘एन्झाईम’ सांध्यातील ऊतींची प्रवेशक्षमता वाढवते. सोप्या भाषेत सांगायचे, तर ते सांध्यातील कडकपणा न्यून करते, जेणेकरून जळूने सोडलेली इतर औषधी द्रव्ये सांध्यात खोलवर पोचू शकतील आणि ‘हायलुरोनिक ॲसिड’ निर्माण होण्यासाठीचा अडथळा दूर केला जाईल.
थोडक्यात पाश्चात्त्य वैद्यक जो घटक शरिरात थेट टोचते, तोच घटक नैसर्गिकरित्या सिद्ध होणे / साठवणे यांतील अडथळा दूर करण्याचे काम जळू करत असते.

३. नैसर्गिक वेदनाशामक
जळूच्या लाळेमध्ये वेदना न्यून करणारे घटक असतात, ज्याला ‘अनेस्थेटिक’ म्हणतात. यामुळे उपचार चालू असतांना रुग्णाला वेदना होत नाहीतच; पण उपचारानंतरही सांध्यातील तीव्र वेदना न्यून होतात. हे परिणाम एखाद्या ‘पेनकिलर’ (वेदनाशामक) गोळीसारखेच; पण पूर्णतः दुष्परिणामरहित असतात.
४. सूज उतरवणे
गुडघेदुखीमध्ये सांध्याला आतून सूज आलेली असते. जळूच्या लाळेत अशी काही प्रथिने असतात, जी ही सूज आणि ‘इन्फ्लमेशन’ मुळापासून न्यून करण्यास साहाय्य करतात. यामुळे गुडघा वाकवणे किंवा चालणे सोपे जाते.
जळू लावणे / जलौकावचरण, म्हणजेच रक्तमोक्षण हे पंचकर्मातील एक आहे. यासाठी तज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन अनिवार्य आहे. परदेशात या उपचारासाठी ‘हिरुडोथेरपिस्ट’ असतात. यासह पोटात घेण्याची आयुर्वेदाची औषधे घेतल्यास बहुसंख्य रुग्णांच्या गुडघे पालटाच्या शस्त्रक्रिया टळू शकतात, हा आजवरचा वैद्यकीय अनुभव आहे.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
आनंदी जीवनासाठी ‘जेवण, प्राणायाम आणि नामस्मरण’ हीच त्रिसूत्री ! – वैद्य सुविनय दामले
आज सोमवती अमावास्या !
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
भारत आधीपासून जे आचरणात आणत होता, तेच पाश्चिमात्य देश आता शोधून काढत आहेत !
‘मेनोपॉज’ (रजोनिवृत्ती) आणि आयुर्वेद : स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक पालटांचा समतोल !